आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते कुटुंबासह कोरोनाच्या कचाट्यात – खबरदारी घेण्याची नितांत गरज, जनसंपर्क कार्यालये बंद करण्याची मागणी

174

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – कोरोनाने पिंपरी चिंचवडचे नेते, नगरसेवक, कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबालाही अक्षरशः वात आणला आहे. आमदार महेश लांडगे, माजी विरोधीपक्ष नेते दत्ता साने, नगरसेवक निलेश बारणे, चंदा लोखंडे यांच्यासह माजी उपमहापौर शैलजा मोरे यांचे चिरंजीव आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते अनुप मोरे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, दोन नगरसेविकांचे पती अशी मोठी जंत्रीच तयार झाली आहे. जनसंपर्क कार्यालयातील सततचा लोक संपर्क, समस्या सोडविण्यासाठी वार्डमधील दौरे, गाठीभेटी यातून कुठेतरी कोरोनाची बाधा होते असे निदान पुढे आले आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनीही खबरदारी घेण्याची नितांत गरज आहे, असे कोरोना नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. सर्व लोकप्रतिनिधींची जनसंपर्क कार्यालये किमान महिनाभर बंद ठवावीत, अशीही मागणी पुढे आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गुरूवारी एका दिवसात दुपारपर्यंत २५० च्या पुढे कोरोना बाधित आढळले. जुलै अखेर पर्यंत हा आक़डा १० हजारापर्यंत असेल असा अंदाज स्वतः आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितला आहे. आमदार लांडगे यांच्या बातमीमुळे त्यांच्या संपर्कातील १२८ जणांची तपासणी केली, पण ते निगेटिव्ह आले. आमदार लांडगे यांचे बंधू कार्तिक यांची सपर्क यंत्रणा मोठी आहे. तेसुध्दा पॉझिटिव्ह होते, पण आज त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बिर्ला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. कोरोना पॉझिटिव्ह मध्ये आजी प्रमाणे माजी नगरसेवकांचीही नावे आहेत. लोकप्रतिनिधींशिवाय प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांचीही बाधितांमध्ये मोठी संख्या आहे. महापालिका मुख्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. कार्यालयातील अधिकारी, नगरसेवक, ठेकेदार, कर्मचा-यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कारण पालिकेतील लोकांचा संपर्क वाढला होता. पोलिस मुख्यालयातील दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह ३० जणांना आजवर बाधा झाली होती. सुखद बातमी म्हणजे अनेकजण बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर हे देखील होम क्वारंटाईन झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागरिक, ठेकेदार यांना महापालिकेत बंदी कायम ठेवण्यात आली आहे.१० जुलै पर्यंत ही प्रवेश बंदी वाढविण्यात आली आहे.

या प्रवेशबंदीचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (दि.०२) रोजी काढला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात “कोरोना” विषाणू COVID-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात होत असलेली वाढ, तसेच नगरसदस्य, पदाधिकारी आणि महानगरपालिका कार्यालयांमधील कर्तव्यावरील कर्मचारी, अधिकारी “कोरोना” बाधित होत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेवून करसंकलन विभागीय कार्यालये व प्रभाग कार्यालयातील करभरणा विषयक कामकाज वगळता दिनांक १० जुलै २०२० पर्यंत महानगरपालिका अधिन सर्व कार्यालयांमध्ये नागरीक, ठेकेदार व इतरांना प्रवेश बंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी महापालिकेशी संबंधित कामकाजाकरिता दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ई-मेल, व्हॉट्सॲपचा वापर करावा. ते ग्राह्य धरुन प्रश्नांचे निराकरण करण्यात येईल, असेही आयुक्तांनी म्हटले आहे. यापूर्वी २० जून ते ३० जून पर्यंत महापालिकेत अशाच प्रकारे प्रवेशबंदी करण्यात आली होती.

नगरसेवकांची कार्यालये बंद ठेवा –
शहरातील १२८ नगरसेवक, तीन आमदार, दोन खासदार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष यांची जवळपास १५० वर जनसंपर्क कार्यालये आहेत. त्या ठिकाणी नागरिकांच्या विविध समस्या, तंटे यासह अनेक कामांसाठी लोकांचा राबता असतो. प्रत्येकजण खबरदारी घेतो, पण येणाऱ्या व्यक्तीनेसुध्दा काळजी घेतली पाहिजे, ते दिसत नाही. सार्वजनिक गर्दी नको म्हणून सर्व अशा ठिकांणांवर बंदी आहे. त्याच पध्दतीने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता ही सर्व जनसंपर्क कार्यालये किमान महिनाभर बंद ठेवा, अशी मागणी पुढे आली आहे. त्याला पर्याय म्हणून मोबाईल अथवा ईमेल संपर्क बंधनकारक करावा. नगरसेवकांनीही आपल्या यंत्रणेला त्या पध्दतीने शिस्त लावली तर त्यांचाही धोका टळेल, असे एका कोरोना योध्दा डॉक्टरांनी सांगितले.

स्थायी समितीची बैठक रद्द –
अर्थकारण महत्वाचे असल्याने सहसा स्थायी समितीची बैठक रद्द होत नाही. आमदार, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी असे एक एक कोरोना बाधित होत असल्याचे लक्षात आल्याने केवळ कोरोनाच्या धास्तीने महापालिका स्थायी समितीची बैठक बुधवारी (दि.१) रद्द करण्यात आली. सतत सहवासात असलेले समिती अध्यक्षांच्या पीए च्या घरातील पत्नी, मुलगा असे दोघे कोरोना पॉझिटिव्ह सापडले.

WhatsAppShare