आमदार जगताप यांचा रुग्णाला मदतीचा हात; किडनी ट्रान्सप्लांटसाठी पाच लाखांची मिळवून दिली तातडीची मदत

61

मूत्रपिंड (कीडनी) निकामी झालेल्या पिंपळेगुरव येथील एका रुग्णाला भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी मदतीचा हात दिल्यामुळे जिवदान मिळाले आहे. या रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून पाच लाख दहा हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत मिळवून दिली. गंभीर आजार असलेल्या शहरातील गरजू रुग्णांनी पैसे नाहीत म्हणून उपचार न थांबविता आपल्या कार्यालयात संपर्क साधावा. त्यांनाही उपचारासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.

सेनापती नारायण दळवी असे मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केलेल्या गरीब रुग्णाचे नाव आहे. सेनापती दळवी हे पिंपळेगुरवमधील श्रीकृष्णनगर येथे राहतात. त्यांना मूत्रपिंडाचा आजार जडला होता. त्यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून उपचार सुरू होते. परंतु, आजार बरा होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (किडनी ट्रान्सप्लांट) करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांनी थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात तपासणी केली. रुग्णालयाने प्रत्यरोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी ६ लाख ३५ हजार रुपये खर्च सांगितला. घरच्या गरीबीमुळे रुग्णालयाने खर्चाचा आकडा सांगितल्यानंतर दळवी यांच्या कुटुंबीयांसमोर पैसे कोठून आणायचे असा प्रश्न उभा राहिला.

दळवी कुटुंबियांनी आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेऊन आजार आणि शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या खर्चाबाबत माहिती दिली आणि मदत करण्याची विनंती केली. आमदार जगताप यांनी दळवी कुटुंबातील सर्वांना धीर देत खर्चाची कोणतीही चिंता करू नये, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी दळवी यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी केंद्राशी संपर्क साधला. त्याच्या माध्यमातून दळवी यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी १ लाख ९० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली. ही मदत तुटपुंजी असल्यामुळे आमदार जगताप यांनी धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांच्याशी संपर्क साधून दळवी यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी

धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासून सेनापती दळवी यांच्यावरील मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाल ३ लाख २० हजार रुपये माफ करण्यास लावले. त्यामुळे दळवी यांच्या कुटुंबियांना मोठा आधार मिळाला. दळवी यांच्यावर आदित्य बिर्ला रुग्णालयात नुकतीच मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आमदार जगताप यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आपणाला आर्थिक मदत झाली आणि पुन्हा जगण्याला बळ मिळाल्याची भावना सेनापती दळवी यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, कोणताही गंभीर आजार असलेल्या शहरातील गोरगरीब रुग्णांनी पैशांअभावी उपचार थांबवू नयेत. विविध आजारांवरील शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून लाखोंची मदत मिळते. तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयांकडूनही गरजू रुग्णांना मदत केली जाते. त्याचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी पिंपळेगुरव येथील आपल्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.