आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा अनोखा उपक्रम

56

पुणे, दि.२२ (पीसीबी) – आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी संघटनात्मक वेळ काढून आपल्या कोथरूड मतदारसंघात एक अनोखा उपक्रम हाती घेतला असून, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या सदिच्छा भेटी घेऊन त्यांच्या कामास प्रोत्साहन देत आहेत. आज त्यांनी सुतारदरा भागातील जिज्ञासा शाळेस आणि सीए प्रसाद कुलकर्णी यांच्या बुकस्पेसला भेट दिली.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील नेहमीच संघटनात्मक कामात व्यस्त असतात. प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटनात्मक बैठका, भेटी-गाठी, कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग आदी कामे नित्याचीच असतात. त्याचबरोबर कोथरूडचे आमदार असल्याने, मतदारसंघातील नागरिकांच्या भेटी घेऊन, त्यांच्या अडचणींसाठी पाठपुरावा करून त्या सोडवणे यावर ही त्यांचा सातत्याने भर असतो. पण आता आणखी एक उपक्रम हाती घेतला असून, सामाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या आणि संस्थांच्या सदिच्छा भेट घेऊन, त्यांचे काम समजावून घेऊन, त्यांना प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली आहे.

त्यानुसार आज त्यांनी कोथरूड मतदारसंघातील सुतारदरामधील जिज्ञासा ओपन लर्निंग स्कूल शाळेस सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेच्या प्रमुख डॉ. ज्योत्स्ना पेठकर यांच्या कडून शाळेची संपूर्ण माहिती घेतली. जिज्ञासा ओपन लर्निंग स्कूल ही शाळा लहान मुलांना कौशल्य आधारित शिक्षण देणारी शाळा आहे. त्यामुळे या शाळेत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार सुतारकाम, शेती यांसह इतर अनेक महत्त्वाचे उपक्रमाचे शास्त्र शुद्ध शिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे, मुलांना लोकशाही आणि प्रशासन यांची ओळख व्हावी, यासाठी मंत्रीमंडळ स्थापन करुन, लहान मुलांनाच मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमाची माहिती घेऊन याचे श्री. पाटील यांनी कौतुक केले.

त्याच बरोबर डहाणूकर कॉलनी मधील सीए प्रसाद कुलकर्णी यांच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या बुकस्पेसला भेट दिली. प्रसाद कुलकर्णी हे व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटट असूनही, वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी काम करत आहेत. स्वखर्चातून तसेच वेगवेगळ्या माध्यमातून पुस्तकांचे संकलन करून, ते वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहेत. आतापर्यंत त्यांनी एक लाखापेक्षा जास्त पुस्तके संकलित केली आहेत. त्यांच्या या उपक्रमास श्री. पाटील यांनी शुभेच्छा देऊन, पुस्तकांच्या संकलनात आपणही योगदान देऊ; असे प्रसाद कुलकर्णी यांना आश्वस्त केले.

WhatsAppShare