‘आमदारांचे राजीनामे स्वीकारणार नाही’

563

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मराठा मोर्चाच्या आंदोलनाची राजकीय झळ बसू नये, म्हणून मराठा समाजाच्या आमदारांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. सर्वपक्षीय मराठा आमदारांनी राजीनामे देण्याचे सत्र सुरू ठेवले असले, तरी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी हिवाळी अधिवेशनापर्यंत हे राजीनामे स्वीकारले जाणार नाहीत, असा पावित्रा घेतला आहे. आतापर्यंत भाजपा, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना या पक्षांच्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत.

समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरात आंदोलने करण्यात आली आहेत. या आंदोलनाला हिंसाचाराचे गालबोट लागले. यामुळे राज्यभर याचे पडसाद उमटले. यामुळे मराठा समाज बांधवांच्या भावना तीव्र झालेल्या असताना आगामी निवडणुकीत त्याचा राजकीय फटका बसू नये, म्हणून शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव, काँग्रेसचे भारत भालके, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर, भाजपाच्या सीमा हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तू भरणे, आमदार राहुल अहेर यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आपले राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे सादर केले आहेत. मात्र अध्यक्ष बागडे यांनी याबाबत निर्णय घेतला नाही. हिवाळी अधिवेशनापर्यंत या आमदारांचे राजीनामे स्वीकारले जाणार नाहीत, असे बागडे यांनी म्हटले आहे.