आमटे दाम्पत्य ‘कौन बनेगा करोडपती’ मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

129

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो ठरलेला ‘कौन बनेगा करोडपती’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याची सुरुवात अत्यंत वेगळ्या पद्धतीनं होणार आहे. समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे हे दाम्पत्य ‘केबीसी’मध्ये सहभागी होणार आहे. केबीसीच्या ‘कर्मवीर’ या विशेष भागात ते झळकणार आहेत.

‘केबीसी’चे सूत्रसंचालक महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे या दोन मोठ्या माणसांच्या सहवासात जवळपास तासभर राहण्याचे भाग्य मला नुकतेच लाभले. त्यांचे जीवन आणि आदिवासींसाठी ते करत असलेले काम अत्यंत प्रेरणादायी आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही असे काम ते करताहेत. केबीसीच्या ‘कर्मवीर’ भागाच्या निमित्ताने ते माझ्यासोबत होते.’, असे अमिताभ यांनी म्हटले आहे.

येत्या ७ सप्टेंबरला या भागाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. डॉ. प्रकाश आमटे यांचे बंधू समाजसेवक विकास आमटे यांनी अमिताभ यांच्या ट्विटला रिट्विट करत हा कार्यक्रम नक्की पाहा, असं आवाहन केले.