आमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल – पाकिस्तान

235

न्यूयॉर्क, दि. ३० (पीसीबी) – संयुक्त राष्ट्र महासभेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी फटकारल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला. सुषमा स्वराज यांच्या भाषणानंतर काय बोलावे हे सुचेनासे झाल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला खरा चेहरा दाखवत खोटं बोलण्यास सुरुवात केली. भारत शांततेसाठी बातचीत करण्याऐवजी घरगुती राजकारणाला पसंती देत असल्याची खुन्नस पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी काढली.

भारतानेच द्विपक्षीय वार्ता रद्द केल्याचा आरोप कुरैशी यांनी केला. पाकिस्तानला प्रत्येक स्तरावर शांततेसाठी बातचीत करायची आहे, पण नवी दिल्ली शांततेऐवजी राजकारणाला प्राधान्य देत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला. संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरुनही भारताने आपला काश्मीरचा राग काढला. आम्हाला गंभीर आणि व्यापक चर्चा करायची आहे, ज्याने सर्व समस्यांचं समाधान होईल, असे कुरैशी म्हणाले.

”भारताकडून सतत एलओसीवर सीजफायरचे उल्लंघन केले जात आहे. आम्हाला हे सांगायचय की आमच्या संयमाचा अंत पाहू नका. भारताने एलओसी पार केली किंवा लिमिटेड वॉरचा प्रयत्न केला तर त्यांना मोठा पलटवार झेलावा लागेल. दक्षिण आशियामध्ये न्युक्लिअर संतुलन ठेवण्याची बातचीत केली जाते. पण पाकिस्तान आण्विक शस्त्रांचा वापर न करण्याची खात्री देऊ शकत नाही,” असे कुरैशी म्हणाले.