आपातकालीन परिस्थितीचे प्रात्यक्षिक देत असताना विद्यार्थ्यीनीचा कॉलेजच्या इमारतीवरुन पडून मृत्यू

112

कोईंबतूर, दि. १३ (पीसीबी) – आपातकालीन परिस्थितीत कसे बाहेर पडावे याचे प्रात्यक्षिक देत असताना १९ वर्षीय विद्यार्थ्यीनीचा कॉलेजच्या इमारतीतून पडून मृत्यू झाला. ही घटना कोईंबतूरमधल्या कोवाई कलाईमगल कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्समध्ये घडली.

एन लोगेश्वरी (वय १९) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यीनीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोईंबतूरमधल्या कोवाई कलाईमगल कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्समध्ये आपातकालीन परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रात्यक्षिक सुरू होते. राष्ट्रीय आपातकालीन व्यवस्थापनाकडून हे प्रात्यक्षिक घेण्यात आले होते. यावेळी अनेक विद्यार्थी कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावर जमले होते. या विद्यार्थ्यांना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याचे प्रशिक्षण ट्रेनर देत होते. तसेच उडी मारणाऱ्या मुलांना झेलायला जाळी पकडून काही विद्यार्थी खाली उभे होते.  पाच विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या हे प्रात्यक्षिक पार पाडले.

मात्र एन लोगेश्वरी प्रात्यक्षिकासाठी तयार नव्हती. इमारतीवरून उडी मारण्याची तिला भीती वाटत होती. पण ट्रेनरने तिला कोणताही विचार न करता तिसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले. यावेळी लोगेश्वरीच्या डोक्याला भिंतीचा मार बसल्याने गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला तातडीने कोईंबतूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिला मृत घोषीत करण्यात आले. कॉलेजमधल्या मॉक ड्रिलचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणात ट्रेनरला अटक करण्यात आली आहे.