आपल्याला लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार – राजेश टोपे

177

 

मुंबई, दि ४ (पीसीबी) – राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे.

खास करुन मुंबई आणि शहरी भागांमधील लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात येईल असे टोपे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपत आहे. मात्र महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची संख्या पाहता राज्यातील लॉकडाउनचा कालावधी वाढण्याचा इशारा आरोग्य मंत्र्यांनी दिला आहे.

“१५ एप्रिलपर्यंत राज्यातील करोनाबाधितांची संख्या कमी होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. सध्या हा आकडा वाढत आहे. आपल्याला लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लॉकडाउनचे निर्बंध सरसकट उठवले जाण्याची शक्यता कमी आहे,” असं मत टोपे यांनी व्यक्त केलं आहे. राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे निर्बंध राष्ट्रीय लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतरही कायम ठेवण्याचे संकेत टोपे यांनी दिले आहे.

शुक्रवारी रात्री साडेआठवाजेपर्यंत देशातील सर्वाधिक करोनाग्रस्त हे महाराष्ट्रात आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरील आकडेवारी सांगते. तसेच करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचेही या आकडेवारीमधून स्पष्ट होत आहे.

“देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्याच्या दोन दिवस आधीच आम्ही राज्यामध्ये लॉकडाउनची घोषणा केली होती. त्याआधीही आम्ही राज्यातील शहरांमध्ये निर्बंध लागू केले होते. अनेक सर्वाजनिक ठिकाणे बंद केली होती. मुंबईसारख्या शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे कठी काम आहे. त्यामुळे लॉकडाउन संपवण्याचा निर्णय हा पूर्ण विचार करुनच घेणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये हा कालावधी वाढवावा लागणार आहे, असे माझे वैयक्तीक मत आहे”, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

WhatsAppShare