“आपण कोणते टगे पोसत आहात ते त्यांनी पाहिलं पाहिजे”; प्रीतम मुंडे बरसल्या

89

मुंबई, दि.१४ (पीसीबी) : विकासाच्या मुद्द्यावरून मुंडे बहीण-भाऊ पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडेंपाठोपाठ आता खासदार पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाना साधला आहे. जिल्ह्यात फिरत असताना रस्ते कोणी केले हे पालकमंत्र्यांनी पाहिले पाहिजे. आपण कोणते टगे पोसत आहोत हेही पाहा, अशी टीका प्रीतम मुंडे यांनी केली आहे. खासदार प्रीतम मुंडे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. जिल्ह्यात फिरत असताना रस्ते कोणी केले हे पालकमंत्र्यांनी पाहिले पाहिजे. आपण कोणते टगे पोसत आहात ते त्यांनी पाहिलं पाहिजे. केंद्रातून जिल्ह्यात मी काय आणलं हे पाहायचं असेल तर परळी नगरपालिकेच्या बाहेर पडून बघा, अशी झणझणीत टीका प्रीतम मुंडे यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनामध्ये मला गतवर्षी मेळाव्याला येता आले नाही. मात्र यंदा उत्साह आहे. हा मेळावा कष्टकऱ्यांचा आहे. भगवान बाबांच्या अनुयायांचा आहे. गतवर्षी गुन्हे दाखल झाले, बीड जिल्ह्यात खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे. मेळाव्यानंतर सत्ताधाऱ्यांचे जिल्ह्यात अनेक कार्यक्रम झाले. केक कापले गेले, जेसीबीने फुले उधळली गेली. पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावरील 12 एकर परिसरात होणार आहे. मेळाव्याआधी गड परिसरातील डागडूजी आणि इतर कामांनी वेग घेतला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे संत भगवान बाबांच्या भव्य मूर्तीच्या खाली असलेल्या गर्भगृहात पाणी साचले होते, तेही बाहेर काढण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी पाणी साचणारच नाही अशी कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आली आहे. हा परिसर वॉटर प्रुफ करण्यात येत आहे. मेळाव्यास राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच बाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा मेळावा पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रीतम मुंडे या भगवानगडावर येत आहेत. या परिसरात सुरू असलेल्या दसरा मेळाव्याचा त्या आढावा घेत आहेत. तसेच काही सूचनाही संबंधितांना देत आहेत.

दरम्यान, दसरा मेळाव्यात पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासह राज्य सरकार पंकजा मुंडे यांच्या निशाण्यावर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अतिवृष्टीमुळे बीडसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांना अजूनही मदत मिळालेली नाही, या मुद्दयावरून त्या सरकारला घेरण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ऊस तोड कामगारांच्या प्रश्नांकडेही त्या सरकारचे लक्ष वेधण्याची शक्यता आहे. खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले नव्हते. त्यानंतर पंकजा यांनी मनातील खदखद बोलून दाखवली होती. त्यामुळे पंकजा मुंडे त्यावर काय भाष्य करतात का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

WhatsAppShare