आधी आमच्या राज्यांच्या नावांचा उच्चार शिकून घ्या, ‘रंग दे बसंती’ फेम सिद्धार्थचा टोला

310

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – हिंदी भाषेच्या सक्तीला तामिळनाडूतून झालेल्या प्रखर विरोधामुळे अखेर केंद्र सरकारने माघार घेतली आहे. बिगर हिंदीभाषिक राज्यांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती करणारी शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील वादग्रस्त शिफारस केंद्र सरकारने वगळली आहे. या शिफारशीला विरोध झाल्याने केंद्राने हे पाऊल उचलले आहे. मात्र सोशल मीडियावर हा अजूनही चर्चेचा मुद्दा आहे. बऱ्याच दाक्षिणात्य सेलिब्रिटींचाही हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध आहे. ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ यानेही सोशल मीडियावर एका नेटकऱ्याला उत्तर देत हिंदी भाषेच्या सक्तीवरून टोला लगावला आहे.

हिंदी भाषिक अन्य भाषा शिकण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, हे सिद्ध करणारी आकडेवारी कुठे आहे? अनेक भाषांपासून हिंदीची निर्मिती झाली आहे, असे ट्विट एका नेटकऱ्याने केले. यावर उत्तर देत सिद्धार्थने ट्विट केले, ‘एका तमिळ स्थानिकाने हिंदी शिकणं आणि सक्तीने हिंदी भाषा शिकून त्यात परीक्षा द्यायला लावणे यात खूप मोठा फरक आहे. मी स्वत: पाच वेगवेगळ्या भाषा बोलतो आणि १० भाषा मला समजतात. मला कधीच त्या भाषा शिकण्यासाठी सक्ती केली गेली नव्हती आणि हे असंच असलं पाहिजे. भारतात विविध भाषा बोलल्या जातात. पण कोणत्याही भाषेची सक्ती केली नाही पाहिजे.’

सिद्धार्थच्या या उत्तरावर नेटकऱ्याने हिंदी भाषा शिकण्यात गैर काय असा प्रतिप्रश्न विचारला. ‘साऊथवाले भाऊ, तुम्ही हिंदीपेक्षा इंग्रजी भाषेला प्राधान्य देता पण असे का? भौगोलिक दृष्टीने विचार केला तरी हिंदी भाषिक तुमच्या राज्याजवळ आहेत आणि इंग्रजी बोलणारे, देशाचे विभाजन करणारे बरेच लांब आहेत. हिंदी भाषेचा स्वीकार करा,’ असे ट्विटमध्ये त्याने म्हटले. यावर उत्तर देताना सिद्धार्थने नेटकऱ्याला चांगलाच टोला लगावला. ‘भाऊ, साऊथवाले म्हणत आधी तुम्ही संमिश्र भाषा बोलणे बंद करा. दुसरी गोष्ट म्हणजे, आमच्या राज्यांची नावे आणि भाषा शिका आणि त्या नावांचा उच्चार नीट करायला शिका,’ असा टोमणा सिद्धार्थने लगावला.