आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची नवी सुविधा

628

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – आधार कार्डामध्ये नव्याने पत्ता अपडेट करणे, हा एक द्राविडी प्राणायाम होऊन बसले आहे. मात्र, पुढीलवर्षी त्यावर मात होण्याची शक्यता आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणातर्फे (यूआयडीएआय) एप्रिल २०१९मध्ये नवीन सेवा सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सध्या पत्ता अपडेट करण्यासाठी कोणताही पुरावा नाही, त्यांची सोय होणार आहे. 

‘यूआयडीएआय’तर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे ज्यांच्याकडे पत्त्याचा योग्य पुरावा नाही, अशी मंडळी सिक्रेट पिनच्या माध्यमातून पत्ता अपडेट करण्याची विनंती करू शकतात. हे पत्र मिळविल्यानंतर पिनच्या माध्यमातून एसएसयूपी ऑनलाइन पोर्टलवर जाऊन पत्ता बदलण्याची अथवा त्यात बदल करण्याची संधी प्राप्त होणार आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना किंवा नोकरी वा व्यवसायासाठी सातत्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणाऱ्यांना आधार कार्डात पत्ता बदलण्याची अडचण भेडसावते. त्यामुळे मिळणाऱ्या लाभांपासून वंचित राहण्याची वेळही ओढवते. मात्र, १ एप्रिल २०१९पासून अस्तित्वात येणाऱ्या नव्या पद्धतीनुसार आधारकार्डधारक ‘यूआयडीएआय’च्या वेबसाइटवर जाऊन ‘सिक्रेट पिन आधार’च्या माध्यमातून विनंती करू शकतात. डेबिट अथवा क्रेडिट कार्ड धारकांना कार्ड वापरण्यासाठी ज्याप्रमाणे पिन पाठवली जाते. त्याचप्रमाणे ही पिन पाठवली जाणार आहे.