आदित्य बिर्ला रुग्णालयाने डांबून ठेवलेल्या वयोवृद्ध रुग्णाचा मृत्यू; रेखा दुबेंना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंबियांचा निर्णय

71

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाने डांबून ठेवलेल्या ७२ वर्षांच्या वयोवृद्ध रुग्णाचा उपचारादरम्यान रविवारी (दि. २६) रात्री मृत्यू झाला. या रुग्णाने उपचाराचे ८६ हजार रुपयांचे बिल दिले नाही म्हणून आदित्य बिर्ला रुग्णालयाने डिस्चार्ज दिल्यानंतर तब्बल दहा दिवस डांबून ठेवले होते. या कालावधीत रुग्णाला जेवण दिले जात नव्हते. तसेच त्यांच्यावर औषधोपचारही केले गेले नसल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. पोलिसांनी रुग्णाची सुटका केल्यानंतर चिंचवडमधील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पुढील उपचार सुरू होते. उपचारादम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. आदित्य बिर्ला रुग्णालयाने त्यांना डाबून ठेवल्यानंतर दहा दिवस जी वागणूक दिली त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे व इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका रुग्णाच्या कुटुंबियांनी घेतली आहे.