आदित्य ठाकरेंची शुक्रवारपासून ‘जन आशीर्वाद’ यात्रा

76

मुंबई, दि. १० (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला बळ देण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी ते ‘जन आशीर्वाद’ यात्रा काढणार आहेत. येत्या शुक्रवारपासून कोल्हापुरातून अंबाबाईचे दर्शन घेऊन ते या यात्रेला सुरुवात करणार आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ ऑगस्टपासून ‘विकास रथयात्रा’ काढणार असल्याचे जाहीर केले आहे.

”जन आशीर्वाद’ यात्रेद्वारे महाराष्ट्रातील ज्या जनतेने आम्हाला मते दिली त्यांचे आपण आभार मानणार आहोत तर ज्यांनी मते दिली नाहीत त्यांची मन जिंकणार आहोत,’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. विधानसभेसाठी आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. तसेच ते शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असतील अशी चर्चाही यापूर्वी रंगली होती. या पार्श्वभूमीवर आदित्य यांच्या या यात्रेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपण १ ऑगस्टपासून ‘विकास रथयात्रा’ काढणार असल्याची घोषणा केली होती. ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ आणि ‘अब की बार २२० पार’ या टॅगलाईनखाली ही रथयात्रा काढण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक मतदारसंघातून ही रथयात्रा जाणार आहे.