आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा

418

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – ‘तुला कासारसाईत राहू देणार नाही, तसेच तुझ्या घरच्यांना जगू देणार नाही’, अशी वारंवार फोनवर आणि प्रत्यक्षात भेटून धमकावल्याने तिघाजणांवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी हिंजवडी  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव गाडेकर असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी लक्ष्मी महादेव गाडेकर (वय ३९, रा. कासारसाई, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिध्दी नितीन गाडेकर (वय १८), गणेश रामदास थोरवे आणि अनिल सोपान थोरवे (सर्व रा. कासारसाई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मी गाडेकर आणि आरोपी सिध्दी, गणेश आणि अनिल  हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तिघांनीही फिर्यादी महिलेचे पती महादेव गाडेकर यांना जून २०१७ ते १८ ऑगस्ट २०१८ दरम्यान वारंवार भांडणे करुन तसेच वारंवार फोनवर आणि प्रत्यक्षात भेटून धमकावल्याने त्यांनी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे फिर्यादी महिलेने तिघा आरोपींविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.