आता शहरात केवळ महापालिकेचे होर्डिंग

118

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये जाहिरात फलकांसाठी देण्यात येणा-या परवानगीच्या बाह्य जाहिरात धोरणास प्रशासकांच्या महासभेने मान्यता दिली आहे. त्यामुळे यापुढे शहरात केवळ महापालिकेच्या मालकीचे एकसमान आकाराचे व सजावटीचे फलक दिसणार आहे.

महापालिका प्रशासन स्वत: होर्डिंग उभारणार आहे. संपूर्ण शहरात अत्याधुनिक पद्धतीचे 20 फूट बाय 40 फूट, 20 फूट बाय 20 फूट आणि 20 फूट बाय 15 फूट अशा एकसमान आकार व डिझाईनचे सुमारे 500 होर्डिंग लावण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्या-त्या भागानुसार चालू बाजारभारवानुसार त्या होर्डिंगचे दर असणार आहेत. विविध देशाचा अभ्यास करुन नवीन जाहिरात धोरण निश्चित केले. एकसमान आकार व डिझाईनचे होर्डिंग महापालिका उभारणार आहे.

निविदा काढून होर्डिंग एजन्सीला उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.  खासगी जागेत महापालिकेच्या अटी-शर्तीनुसार होर्डिंग उभारणे बंधनकारक असणार आहे. त्याचा आकार व डिझाईन पालिका निश्चित करणार आहे. नियमात असलेल्या होर्डिंगला महापालिका परवानगी देणार आहे. यातून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.  या धोरणामुळे शहराचा लुक बदलण्यास आणि शहर सौंदर्यीकरण वाढीस मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.