“आता या ‘लीडरलेस’ सिटीला वैचारिक मशागतीची गरज” – थर्ड आय – अविनाश चिलेकर

124

उद्योगनगरी, कामगारनगरी पिंपरी चिंचवड ११ ऑक्टोंबरला वर्धापनदिन साजरा करते आहे. पाहता पाहता हे शहर चाळीशीत पोचले. पुणे शहराचे जुळे भावंड म्हणून चिंचवड, पिंपरी, भोसरी, आकुर्डी अशा चार ग्रामपंचायतींची मिळून नगरपालिका स्थापन करण्यात आली. अण्णासाहेब मगर यांची ही निर्मिती. पुढे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. समाजवादी कार्यकर्ते डॉ. श्री. श्री. घारे यांच्यासारख्या विद्यावान स्वातंत्रसेनानीला प्रथम नगराध्यक्ष म्हणून जनतेने निवडूण दिले. कारखानदारीमुळे सर्वाधिक जकात महसूल होता म्हणून आशिया खंडात दरडोई उत्पन्नात अव्वल दर्जाची नगरपालिका होती, त्यातून आपसूकच `श्रीमंत शहर` हा किताब मिळाला. १९८२ मध्ये नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले. सुरवातीचे चार वर्षे हरनामसिंह यांच्यासारखा अत्यंत कार्यक्षम प्रशासक शहराला मिळाल्याने त्यांच्या दूरदृष्टीतून मोठी वृक्षारोपन मोहिम राबविली गेली. त्याचाच परिणाम आज शहर ३३ टक्के हिरवेगार आणि हवेशीर आहे. टेल्को, बजाज सारख्या वाहन कंपन्यांमुळे ५ हजारावर लघुउद्योग आले. १२०० हेक्टरवर एमआयडीसी विस्तारली. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तब्बल ३-४ लाख हातांना काम मिळाले. त्यातून अर्थकारण पूर्णतः बदलले. १९९०-९२ च्या दशकात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळातील प्रमोदजी महाजन यांच्या मुळे हिंजवडीच्या माळावर आयटी-बीटी पार्क आला आणि हे ग्रामपंचायत लेव्हलचे शहर एकदम ग्लोबल झाले. तेव्हापासून महानगराच्या दिशेने जी वाटचाल सुरू आहे ती आजही कायम आहे. त्या काळात ४-५ लाख लोकसंख्येचे हे शहर होते. रोजगाराच्या मोठ्या संधीमुळे देशाच्या सर्व भागातून लोक इथे आले. आजही देशात सर्वाधीक वढिचा वेग म्हणजे तब्बल ७० टक्के आहे. ३० लाखावर गेलेली लोकसंख्या २०३० पर्यंत ४० लाखाच्या पुढे असेल असा एक अंदाज आहे. मध्यंतरी स्मार्ट सिटीच्या निमित्ताने एक सर्वेक्षण केले गेले. त्यात सर्वाधिक संधीचे आणि राहण्यायोग्य असे शहर असल्याचे निष्कर्श पुढे आले. पुणे आणि मुंबई ही शहरे आता गच्च भरलीत, अक्षरशः सुजली आहेत. तुफान शहरीकरणातून आलेली वाहतूक कोंडी, वाढणारे अपघात, प्रदुषण, गुन्हेगारीने लोक आता थोडी शांतता असलेले शहर शोधतात. घरांच्या किंमती अफाट, आवाक्याबाहेर वाढल्याने तिथे घर घेता येत नाही. त्या तुलनेत पिंपरी चिंचवड सर्वार्थाने योग्य शहर असल्याने मध्यमवर्गाचा ओढा इकडे आहे. विकास कामांची रेलचेल आहे. दुष्काळातही इथे २४ तास पाणी मिळते, देशातील अन्य शहरांची तुलना केली तर रस्ते एकदम प्रशस्त आहेत. आगामी काळात केवेळ पूल, उड्डाणपूल आणि मोठ्या रस्त्यांमुळे पिंपरी चिंचवडची श्रीमंती आणि रुबाब आणखी वाढणार आहे. विकास आराखड्यातील आरक्षणे आणि नियोजन पध्दतशीर, वेळेत झाले तर आगामी काळात हे एक स्वप्नवत महानगर असेल.

आज महापालिकेचा वर्धापनदिन असला तरी स्थापनेपासूनचा विचार केला तर हे शहर ५० वर्षांचे झाले आहे. आगामी ५० वर्षे कशी असतील, त्यासाठी आपण काय केले पाहिजे. सुखी, समाधानी, शांत आयुष्य जगण्यासाठी लोक इथे स्थिरावतात, मग त्यांनी अधिकाधिक चांगल्या सोयी कशा देता येतील याचा विचार राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. खरे तर, भविष्यातील पिंपरी चिंचवड कसे असेल अथवा असावे या विषयावर एखादा परिसंवाद, मंथन घडवून आणले पाहिजे. शहरातील तज्ञ, विचारवंत, समाजसेवक, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स, अभियंते, वकिल, शिक्षक, प्राध्यापक, शैक्षणिक संस्थाचालक, बांधकाम व्यावसायिक, लष्करी सेवेतील निवृत्त अधिकारी अशा सगळ्या घटकांना महापालिकेत एकत्र बोलावले पाहिजे. देशविदेशात सेवा बाजवलेले शेकडो मान्यवर इथे राहतात. ऑलिंम्पिकमध्ये चमक दाखविलेले खेळाडू आहेत. कब्बडी, कुस्ती मध्य मैदान मारलेल्या पठ्यांचे हे माहेरघर आहे. गावे असताना तब्बल पाऊनशेवर तालमी शहरात होत्या, आता खासगी जिम्स आहेत. सुदैव असे की या शहरात मोकळ्या जागांची बिलकूल कमी नाही. पुण्यात नाहीत इतकी नाट्यगृहे, जलतरणतलाव, क्रीडांगणे, मैदाने आहेत. शेती, जमीन जुमला सगळे आहे. या साधनसंपत्तीचा मेळा घालून, प्रत्येक कामांत लोकसहभाग वाढवून हा गाडा विनाअडथळा आणखी वेगात पुढे नेता येऊ शकतो. फक्त कमी आहे ती एका जाणकार, निस्वार्थी, निरपेक्ष भावनेने काम कऱणाऱ्या सच्च्या नेत्याची. ५० वर्षांत या शहराचा बाप पैदा झाला नाही. जे नेते म्हणून आहेत त्यांच्या दलाली, ठेकेदारीमुळे लोक त्यांना मागे शिव्याशाप देतात. ज्यांचे पाय धुवून पाणी प्यावे असे नेतृत्व पाहिजे आहे. बारामतीला एक शरद पवार, अजित पवार मिळाले पण पिंपरी चिंचवडला बाहेरचे सोडा, स्थानिक भूमिपुत्रांतूनही एक चांगला कारभारी या शहराला मिळत नाही ही शोकांतिका आहे. आजही हे शहर त्या अर्थाने `लीडरलेस` आहे. एक आदर्श नेता घडवायचा तर त्याला काही पिढ्यांची तपःश्चर्या लागते. पवार काका पुतण्यांनी शहराला भरपूर दिले, पण राजकीय स्वार्थासाठी त्यांनीही इथले स्थानिक नेते कायम खुजेच ठेवले. १० टक्के गाववाले ९० टक्के बाहेरचे लोक आहेत, पण राजकारणात ७०-८० टक्के गाववाले आणि जेमतेम २०-३० टक्के बाहेरचे असे समिकरण आजही कायम आहे. जोवर हे समिकरण बरोबरीत होत नाही, सर्व जनतेचा सक्रीय सहभाग या निर्णय प्रक्रीयेत येत नाही तोवर खरे नाही. राजकीय मंथन पाहिले तर त्या दिशेने वाटचाल सुरू आहे आणि पुढच्या १० वर्षांत हा बदल दिसेल अशीही अपेक्षा आहे.

जिल्हा, प्रांत, जात, भाषा, धर्म निहाय संघटना खूप मोठ्या प्रमाणावर या शहरात आहेत. या प्रत्येकाने ‘आमचे पिंपरी चिंचवड’, ‘आम्ही पिंपरी चिंचवड’चे असे छातीठोकपणे म्हटे पाहिजे. आम्ही पुणेकर हे पुणेकर मंडळी कंठरवाने कसे जगभर सांगतात. तसा अभिमान, अस्मिता आता पिंपरी चिंचवड शहराबाबत जाणीवपूर्वक निर्माण करण्याची गरज आहे. थोडे संकुचित वाटेल पण शहराच्या जडणघडणीसाठी त्याची गरज आहे. आत्मसन्मान हरवलेले शहर हे एद्या मुर्दाड व्यक्तीसारखे असते. शहरातील दुसरी सगळ्यात मोठी कमतरता म्हणजे या शहराची वैचारीक मशागत करण्याची जडणघडन करण्याची नितांत गरज आहे. जोवर वाचन, लेखन, विचारमंथनाला महत्व इथे नाही तोवर गल्लीतले नाना, भाऊ, भाई, दादा हेच आमचे पालक असतील. सज्जन मंडळी भेकडासारखी बिळात लपून बसतात आणि त्यामुळे तमाम दुर्जन शहरावर राज्य करतात याचे दुःख आहे. महापालिकेची १२५ वर वाचनालचे होती ती मोडीत काढली. ३०-४० समाजमंदिरे आहेत, पण अनेक ठिकाणी त्यांचे जुगार अड्डे झालेत. सावित्रीबाई फुले स्मारकात ब्रिटीश लायब्ररी सारखे संदर्भ पुस्तकांचे ग्रंथालय गेली १५ वर्षे कागदावर आहे. हे पाहिल्यावर इथल्या राज्यकर्त्यांचा वकूब कळतो. वैचारीक विरोधक म्हणजे आपला शत्रू, अशी धारणा असलेले टपोरी, गुंड, मवाली तमाम कार्यक्रमांचे प्रमुख अतिथी म्हणून बोलवावे लागतात. हे चित्र बदलण्याची गरज आहे. सुमारे ५० व्याख्यानमाला या शहरात चालतात, पण सगळ्यात मोठे दुर्दैव असे की, ३० लाखाच्या या थोराड शहरात एकही चांगला व्याख्याता मिळत नाही. त्यासाठी पुणे शहराकडे तोंड करून बसावे लागते. महापालिकेने पाच-सहा सुसज्ज अभ्यासिका तयार केल्या आहेत, पण एकही आयएएस इथून निपजत नाही. क्रीडा अकादमी आहे, संगीत अकादमी आहे पण लक्षवेधी काम असेल असे खेळाडू, गायक, वादक शहरात तयार होत नाहीत. कारण या संस्थांचीही राजकारण्यांनी दुकाने केली आणि मूळ हेतुला हरताळ फासला. माकडाच्या हाता कोलीत दिल्याने हे असेच रिझल्ट येतात. हे आपण बदलायला हवे, ते सहज शक्य आहे. महापालिका निवडणुकित फक्त निवडूण येण्याची क्षमता असलेले उमेदवार देण्यापेक्षा, या लोकशाहिच्या उत्सवात आजवर किनाऱ्यावर बघ्याची भूमिका घेणाऱ्या भल्या मंडळींना, सज्जनांना प्रवाहत आणा. देवेंद्र फडणवीस अजित पवार, संजय राऊत हे नेते निवडणुकिच्या निमित्ताने ते करू शकतात. कारभार बदलायचा तर कारभारी बदला. अन्यथा शहराचा कडेलोट होईल. सोन्या सारखे चमकणारे हे सुंदर शहर आहे. शहराच्या भल्याचा विचार केला तरी वर्धापनदिन सार्थकी लागला असे म्हणता येईल.

WhatsAppShare