आता ‘या’ ठिकाणी होणार भारत-श्रीलंका मालिका

32

नवी दिल्ली, दि.१२ (पीसीबी) : भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्याच्या मध्येच श्रीलंकेविरुद्ध होणारी एकदिवसीय आणि टी २० सामन्यांची मालिका कोलंबोत आर. प्रेमदासा मैदानावर खेळविली जाण्याची शक्यता आहे.

सध्या श्रीलंकेतील कोविड १९ संसर्गाची परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. ती तशीच रहावी आणि जैव सुरक्षा कवच भक्कम रहावे यासाठी एकाच केंद्रावर सर्व सामने खेळविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. आम्ही एकाच केंद्रावर ही मालिका घेण्याचा विचार नक्की केला आहे. प्रेमदासा स्टेडियमला पसंती मिळत आहे. पण, प्रत्यक्ष मालिकेच्या कालावधीत कशी परिस्थिती असेल, त्यावर निर्णय घेतला जाईल, असे श्रीलंका क्रिकेट प्रशासकीय समितीचे कार्याध्यक्ष अर्जुन डीसिल्वा यांनी सांगितले.

भारतीय संघ या मालिकेसाटी ५ जुलैस श्रीलंकेत अपेक्षित आहे. त्यानंतर एका आठवड्याचे विलगीकरण पूर्ण झाल्यावर १३ जुलैपासून मालिकेस सुरवात होईल. एकदिवसीय मालिका झाल्यावर २२ आणि २७ जुलै दरम्यान टी २० सामने होतील.

नियमानुसार खेळाडूंना पहिले तीन दिवस कडक विलगीकरणात रहावे लागेल आणि त्यानंतर चार दिवस त्यांना सरावाची परवानगी असेल, असेही डीसिल्वा यांनी स्पष्ट केले. अर्थात, आरोग्य मंत्रालयात यात काही बदल सुचविल्यास त्याचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे. इंग्लंड आणि बांगलादेशाविरुद्धच्या मालिका आम्ही यशस्वी केल्या. त्याप्रमाणे ही मालिका देखिल यशस्वी होईल असा विश्वासही डीसिल्वा यांनी व्यक्त केला. कोविड १९ ची परिस्थिती लक्षात घेता सामने हे बंद दरवाजा आड (प्रेक्षंकाशिवाय) खेळविण्यात येणार आहे.

भारतीय कसोटी संघ यावेळी इंग्लंडच्या दौऱ्यावर असल्यामुळे येथे भारताचा व्हाईट बॉल सामन्यांचा संघ उतरेल. यात शिखर धवन, युजवेंग्र चहल, पृथ्वी शॉ, असे खेळाडू असतील. प्रशिक्षकाची जबाबदारी पारस म्हांब्रेवर असेल आणि सपोर्ट स्टाफ नसल्यामुळे राहुल द्रविडला संघासोबत जाण्यास सांगण्यात येईल, असे समजते. अर्थात,अजून अंतिम निर्णय झालेला नाही. योग्य वेळेत निर्णय घेतला जाईल, असेचे बीसीसीआयचे पदाधिकारी म्हणत आहेत.

WhatsAppShare