आता मुंबईप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणच्या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळणार

78

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – मुंबईप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणच्या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळणार आहेत, यासाठी म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरांतही मालकी हक्कांच्या घरांची योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी सिडको आणि म्हाडाला या शहरांमध्ये पोलिसांच्या घरांसाठी जमीन निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पोलिस गृहनिर्माण मंडळाची बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली. या बैठकीमध्ये मुंबईतील बीडीडी चाळींत ३० वर्षांहून अधिक काळ राहात असलेल्या पोलिसांना तेथील घरे मालकी हक्काने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच पोलिसांच्या मालकी हक्कांच्या घरांसाठी पनवेल येथे राज्य सरकारने जमीन दिली आहे. तेथे मालकी हक्काच्या घरांची योजना राबविली जात आहे. या पद्धतीने राज्यातील नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या शहरातही अशा पद्धतीने पोलिसांच्या घरांची योजना राबविण्यात येणार आहे. महसूल तसेच राज्य सरकारच्या अन्य विभागांकडून या शहरातील जमिनी घेतल्या जाणार आहेत. यासाठी गृह विभागाने आराखडा तयार केला असून, लवकरच योजनेची सुरुवात केली जाणार असल्याचे संकेत आहेत.