आता फक्त एक लढत

53

नवी दिल्ली, दि.२७ (पीसीबी) : भारताची महिला बॉक्सर लोवलिना बोर्गोहिने हिने आपला फॉर्म कायम असल्याचे पहिल्याच फेरीत दाखवून दिले. स्पर्धेतील ६९ किलो वजन गटातून तिने जर्मनीच्या अनुभवी नादिने अॅप्टेझ हिचा पराभव केला. या विजयाने तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली असून, पहिल्या ऑलिंपिक पदकापासून आता ती केवळ एक लढत दूर आहे. तिची गाठ आता तैवानच्या निएन चिन चेन हिच्याशी पडणार आहे.

भारताची एकच बॉक्सर आज रिंगमध्ये उतरणार होती. सुरवातीपासून निर्विवाद वर्चस्व राखून तिने विजय मिळविला, तरी जज्जेस तिच्याविरुद्ध एकमताने निर्णय देऊ शकले नाहीत ,याचेच राहून आश्चर्य वाटते. पंचांनी ३-२ असा निर्णय तिच्या पारड्यात टाकला. अशा रितीने ऑलिंपिकसाठी दाखल झालेल्या नऊ बॉक्सर्स पैकी उपांत्यपूर्व फेरी गाठणारी ती पहिली बॉक्सर ठरली आहे.

वय आणि अनुभवात ही लढत तोलायची झाली, तर सळसळत्या तरुण रक्ताने अनुभवाला आव्हान दिले आणि विजय मिळविला असे म्हणायला वाव आहे. भारताची लोवलिना २३, तर अॅप्टेझ ३५ वर्षाची. लोवलिना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या पायरीवर, तर अॅप्टेझ ही दोन वेळा जागितक ब्रॉंझपदक विजेती खेळाडू. त्यामुळे ही लढत कमालीची तणावपूर्ण झाली. लढतीची सुरवात आणि लोवलिनाचा खेळण्याचा दृष्टिकोन बघितला, तर कोण अनुभवी हेच कळत नव्हते. जबरदस्त आक्रमण आणि डाव्या – उजव्या पंचमध्ये असलेला कमालीचा समन्वय यामुळे लोवलिनाने अॅप्टेझला बचावाची साधी संधी देखिल मिळू दिली नाही. तिसऱ्या फेरीत अॅप्टेक जरूर आक्रमक झाली. पण, तोवर उशिर झाला होता. पहिल्या दोन फेऱ्या निर्विवाद जिंकताना लोवलिनाने आपली बाजू भक्कम केली होती.

लोवलिनाचा आजचा खेळ कमालीचा नियोजनबद्ध होता. प्रशिक्षकाने दिलेल्या सूचना तिने तंतोतंत पाळल्याचे दिसून येत होते. जबरदस्त आत्मविश्वासाने ती ही लढत खेळली. आपण फॉर्ममध्ये आहोत आणि राहणार हेच तिची देहबोली सांगत होती. तिच्या आजच्या विजयाने सिमरनजीत, पूजा राणी, अमित फंगल या बाकी खेळाडूंना नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल. कमॉन इंडिया…

WhatsAppShare