आता पाकिस्तानात भारतीय चित्रपटांच्या सीडी विक्रीवरही बंदी

156

इस्लामाबाद, दि. १६ (पीसीबी) – भारत सरकारने जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवल्यापासून चिडलेल्या पाकिस्तानकडून विविध निर्णयांद्वारे भारतावरील राग व्यक्त केला जात आहे. काही दिवस अगोदरच पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट आणि टीव्ही शोजच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर भारतात तयार झालेल्या आणि भारतीय कलाकारांनी काम केलेल्या जाहिरातींवर देखील बंदी आणली गेली. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अॅथॉरिटीने (PEMRA) हा निर्णय घेतला होता. आता तर भारतीय चित्रपटांच्या सीडी विक्रीवरही पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे.

पाकिस्तान सरकारकडून भारतीय चित्रपटांच्या सीडींच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही भारतीय जाहिरातींवर बंदी आणली आहे. तसेच, भारतीय चित्रपटांच्या सीडींची विक्री करणाऱ्या दुकनांवर कडक कारवाई करणे सुरू केले आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या विशेष सहाय्यक फिरदौस आशिक अवान यांनी सांगितले असल्याचे डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने म्हटले आहे.

तसेच, त्यांनी हे देखील सांगितले आहे की, गृह मंत्रालयाने या अगोदरच राजधानीत भारतीय चित्रपटांवर बंदी आणण्यासाठी कडक कारवाई सुरू केलेली आहे. आता ही कारवाई स्थानिक पातळीवरील शासनाच्या मदतीने देशभरातील विविध भागांमध्ये केली जाणार आहे. आजच गृह मंत्रालयाकडून इस्लामाबादेत सीडी विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे मारण्यात आले. या कारवाईत भारतीय चित्रपटांच्या सीडी जप्त करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.