आता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार

125

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी  नीट परीक्षा आता वर्षातून एकदाच घेण्यात येणार आहे. तसेच ही परीक्षा ऑनलाइन होणार नसून विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे, अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत नीटसहीत जेईई मेन्स, नेट, सीमॅट, जीपॅटच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. एनटीएने डिसेंबर २०१८ ते मे २०१९ दरम्यान होणाऱ्या या परीक्षांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. त्यानुसार यंदा नेटची परीक्षा ९ डिसेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान होईल. त्यानंतर १० जानेवारी रोजी नेटचा निकाल घोषित केला जाईल. जेईई मेन्स-१ ची परीक्षा पुढच्या वर्षी ६ ते २० जानेवारी दरम्यान होणार आहे. त्याचा निकाल ३१ जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहे. जेईई मेन्स-२ चा निकालही ६ ते २० एप्रिल दरम्यान होणार असून त्याचा निकाल ३० एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

सीमॅट आणि जीपॅटची परीक्षा २८ जानेवारी २०१९ रोजी होईल आणि त्याचा निकाल १० फेब्रुवारी रोजी लागेल. या सर्व परीक्षा ऑनलाइन घेतल्या जातील. तर नीटची परीक्षाही वर्षातून एकदाच होणार आहे. आता ही परीक्षा ५ मे २०१९ रोजी होणार आहे. त्याचा निकाल ५ जून रोजी असेल.