आता डब्लूएचओ म्हणते…रेमडेसिवीर औषध कोरोनावर गुणकारी नाही

25

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील करोना उपचारात वापरण्यात आलेल्या रेमडेसिवीरसह चार औषधे कोविड १९ उपचारात गुणकारी नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. त्यात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, लोपिनावीर/ रिटोनावीर तसेच इंटरफेरॉन या औषधांचाही समावेश आहे.

भारतात अजूनही रेमडेसिवीर हे प्रभावी औषध मानले जात असून त्याचा वापर उपचारात मोठय़ा प्रमाणावर केला जात आहे. काहींना तर हे औषध मिळण्यात अडचणी आल्या होत्या. सुरुवातीला या औषधाची एक कुपी पाच हजार रुपयांना होती आता सरकारने त्याच्या किमतीवर नियंत्रण आणले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यादृच्छिक पद्धतीने करण्यात आलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष जाहीर केले असून त्यात म्हटले आहे की, रेमडेसिवीर, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, लोपिनावीर/रिटोनावीर, इंटरफेरॉन या औषधांचा कोविड १९ रुग्णांवरील उपचारात कुठलाच अपेक्षित परिणाम दिसून आलेला नाही. रुग्णाला मरण्यापासून वाचवण्यात किंवा त्याचा रुग्णालयातील कालावधी कमी करण्यात ही सगळी औषधे बाद ठरली आहेत. इबोलावरचे रेमडेसिवीर हे औषध कोविड १९ वर वापरण्यात येत होते त्याला अमेरिकेतही मान्यता मिळाली. ब्रिटन व युरोपीय समुदायानेही या औषधाचे चांगले परिणाम दिसून येतात असे सांगितले पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. काही रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार रेमडेसीवीरमुळे मूत्रपिंडे निकामी होत असून या औषधाचा वापर आता युरोपात मर्यादित करण्यात आला आहे. सहा महिन्यांच्या प्रयोगानंतर ही चारही औषधे निरूपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाचे मार्टिन लँड्रे यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन व लोपिनावीर या औषधांवर जो अभ्यास केला तो आधीच्या ब्रिटिश संशोधनाशी जुळणारा आहे. मुद्दय़ाची गोष्ट अशी की, ज्याचा गाजावाजा केला गेला ते रेमडेसिवीरही करोनावर गुणकारी नाही किंवा त्यामुळे उपचारात मदत होते अशातलाही भाग नाही. काही देशात तरीही त्याचा वापर चालू आहे. हे औषध ५ ते १० दिवस नसेतून दिले जाते. त्याच्या मदतीने उपचारासाठी २५५० डॉलर्स खर्च येतो. एकूण तीस देशात या औषधांचा अभ्यास जागतिक आरोग्य संघटनेने केला असून या चारही औषधांनी रुग्णांची प्रकृती लवकर सुधारते किंवा त्यांचे मृत्यू टळतात यातील एकही गोष्ट खरी नाही हे स्पष्ट झाले आहे.

WhatsAppShare