“आता चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या; राणे-ठाकरे येणार एकाच मंचावर’

104

मुंबई, दि.२८ (पीसीबी) : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आलेच पाहिजे असं काही नाही, असं केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्याच चिपी विमानळाचं आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चिपी विमानतळाच्या उद्घघाटनाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याची कार्यक्रम पत्रिकाही छापण्यात आली आहे. कार्यक्रम पत्रिकेनुसार येत्या 9 ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाचं लोकार्पण होणार आहे. त्याच दिवशी 12.30 वाजता या विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार आहे.

कार्यक्रम पत्रिकेनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रम पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचं नाव सर्वात वर आहे. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांचं नाव आहे. तर राणेंचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. अर्थात प्रोटोकॉलनुसार हा क्रम देण्यात आला आहे. या आधी राणेंनी चिपीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आलेच पाहिजे असं काही नाही असं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर हा प्रोटोकॉल म्हणजे राणेंसाठी चपराक असल्याचं मानलं जात आहे.

राणे यांना जन आशीर्वाद यात्रे दरम्यान अटक करण्यात आली होती. त्यामुळे राणे समर्थक संतप्त झाले आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये ठाकरे-राणे एकाच मंचावर येत असल्याने राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

राणेंनी 7 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची नवी तारीखही जाहीर केली. विमानतळाच्या उद्धाटनासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर असं काही नाही. मुख्यमंत्र्यांना बोलावलंच पाहिजे असं काही नाही. संबंधित मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेत. मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही, असं ते म्हणाले होते. त्यावरून गदारोळ उठला होता. शिवसेनेनेही राणेंवर जोरदार टीका करताना हा अधिकार त्यांना कुणी दिला असा सवाल केला होता.

विमानतळाच्या मालकीवरून शिवसेना आणि राणेंमध्ये जुंपली आहे. राणेंनी हे विमानतळ केंद्र सरकारच्या अधिपत्याखालीच असल्याचा दावा केला आहे. तर राऊत यांनी हा एअरपोर्ट एमएमआयडीसीचा आहे. पीपीपी मॉडेलवरील आहे. तो महाराष्ट्राचाच आहे. केंद्राने केवळ लायसन्स दिलं आहे. हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्राचाच आहे, असं स्पष्ट केलं. मात्र, विमानतळाचा अधिकार कुणाकडेही असला तरी एखाद्या राज्यात एखाद्या प्रकल्पाचं उद्घाटन होत असेल तर त्या कार्यक्रमाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांना द्यावचं लागतं. कार्यक्रम पत्रिकेतही मुख्यमंत्र्यांचं नाव टाकावं लागतं.

WhatsAppShare