आताच्या परिस्थितीवर “एका झाडाची” भावना काय असेल ? नक्की वाचा – किशोर हातागळे

50

पर्यावरण दिन विशेष

प्रिय,
ऑक्सिजन शोधणाऱ्या मानवा,

आज तुझ्याशी थोडसं बोलावसं वाटलं, कित्येक दिवस आपल्यातील अंतर खुपच वाढत चाललय, सगळीकडे सिमेंटची जंगलं तुम्ही निर्माण करायला घेतली तशी आमची कत्तलही मोठी झाली, हिरवीगार झाडं आम्ही, तुटून गेलो, फांद्या तुटल्या, पानं विस्कटली, उभे असलेले पाय आमचे मुळापासुन छाटले गेले, झाडांवर राहणारे अनेक घरटे बेघर झाले, थंड हवा आणि पक्षांची किलबिल कायमची बंद झाली, घनदाट निसर्ग लोप पावला, आमच्या अंगाखांद्यावर झोके घेणाऱ्या तुमच्या चिमुकल्या बालकांपासुन, आमच्या कुशीत आश्रय घेणारे वयोवृध्द यांच्यापासुन दुर होऊन आम्हीही नष्ट झाले, त्यामुळे आपल्यातील संपर्क आता कमी झालाय, पण मी आता नुकतच ऐकलं, “तुम्ही आता ऑक्सिजन शोधताय ?” हे खरं आहे का, खरचं तुम्ही आता ऑक्सिजन शोधण्यात व्यस्त आहात का? हे ऑक्सिजन शोधणाऱ्या माणसा, तु तर आमची काळजी करणं आणि आमच्याकडे लक्ष देणं आता सोडुनच दिलस पण आम्हाला तस करून चालणार नाही, अजुनही तुम्हाला माझी म्हणजे झाडाची, प्राणवायुची- ऑक्सिजनची कसलीच कदर वाटत नाही? हिरवीगार वनराई, आंबराई बिल्डरच्या घशात घालुन आमचा व स्वतःचा मोकळा श्वास तुच कैद करून घेतलास, हे तुला आता पटत असेलही पण ती वेळ आता निघुन गेली..!

जेवढी तुम्ही माणसं आता सुटाबुटात आलात तेवढयाच जास्त प्रमाणात मोठमोठया झाडांच्या कत्तली करून निसर्गाचा व पर्यावरणाचा ऱ्हास खुप वेगाने करत आहात, एका रोपट्यापासुन वाढणारं झाड त्या चिमुकल्या बाळासारखं असतं ते रांगतं, पायावर उभं राहतं, मग तरुण होतं, मग वयस्कर होतं जसं काही आपल्याच कुटुंबातील व्यक्ती. पण तुम्हाला माणसांचीच किंमत झाडांची कसली किंमत? जागेची अडचण वाटायला लागते मग पुढंमागे न बघता आमच्यावर कुऱ्हाड चालवली जाते आम्हालाही अश्रु आहेत, आमच्याही नसात रक्त आहे, पण ते तुम्हाला न जाणवणारं आहे, आम्ही फक्त ओरडू शकत नाही, स्वता:च जीव वाचवताना प्रतिकार करू शकत नाहीत, आमचं तुम्हाला एवढं ओझं होतं आणि तुम्ही बिनदास्त आमची कत्तल करता, पण घरातील व्यक्तीसोबत तुम्ही असं कधी वागाल का?

मोठमोठी झाडे तोडून तुम्ही घराबाहेरील अंगणात व टेरेसच्या कुंड्यात शोभेची रोपटी लावुन घर तर आकर्षक केलत, पण मनाला आणि आरोग्याला शांती देणारं खरं निसर्गाचं सौंदर्य आज तुमच्यामुळे नष्ट होत चाललय. पिंपळ, वड, कडुनिंब अशा खरा प्राणवायु देणाऱ्या मोठ्या झाडांची तुम्हाला किंमत राहिली नाही, “आमच्या टेरेसवर तर शोभेची आणि कलमी छोट्या छोट्या झाडांची आरास असावी, मग कशाला पाहिजे मोठी मोठी झाडं?” रस्त्यावर उन्हाच्या चटक्यापासुन वाचायला सावली आणि पावसाळ्यात भिजायला नको म्हणुन या झाडांनी फक्त “छत्री” बनुन राहावं एवढीच या झाडांची तात्पुरती गरज.

तुमच्या वाडवडिलांनी किती जपुन आमची काळजी घेतली स्वतःच्या मुलाप्रमाणे. कधी लांब जाऊन आम्हाला विहिरीचं पाणी पाजलं तर कधी मायेने आमच्यासाठी खत टाकलं, एवढं सगळं कुणासाठी केलं तुमच्यासाठीच ना ? तुम्हाला बसायला सावली व्हावी, मनसोक्त बागडायला, झोके घ्यायला व तुम्हाला चांगला स्वच्छ ऑक्सिजन मिळावा, तुमचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी हट्टहास केला पण तुम्ही काय केलं, वडील गेले की तेच ३०-४० वर्षाचं झाडं तोडून तिथचं टुमदार घर बांधलं, ५-६ कुंड्यात छोटी छोटी शोभेची रोपटी लावली, झालं संपली जबाबदारी? हेच प्रत्येकांनी केलं, आज गावं सोडली तर फक्त रस्त्याच्या कडेलाच मोठी-मोठी झाडं दिसतात, झाडाची सावली सर्वांना पाहिजे पण कोमेजलेल्या झाडांना बादलीभर पाणी पाजण्यासाठी कुणी पुढे होत नाही. फळांच्या झाडांची तर तुम्ही काळजी घेता कारण ते तुम्हाला फळ देतं, स्वार्थासाठी का होईना त्यांना तुम्ही जपता पण वड, पिंपळ, कडुनिंब, तुळस, यासारखी तुम्हाला निरोगी ठेवणारी आणि भरभरून ऑक्सिजन देणारी झाडं तुम्हाला आज नकोशी वाटतात, पण तुम्हाला माहीत आहे ही झाडं तुम्हाला मोकळा श्वास देतात प्राणवायु ऑक्सिजन देतात. तुमचं जीवन फक्त त्यावरच अवलंबून आहे, एकवेळ अन्नपाण्याशिवाय काही काळ तुम्ही जिवंत राहू शकता पण काही मिनिटांच्या ऑक्सिजनविना तुम्ही जगुच शकत नाहीत, तरीही तुम्हाला नैसर्गिक ऑक्सिजन निर्माण करणारी झाडं नकोत?

एक मोठं झाड दररोज २३० लिटर ऑक्सिजन देतं, आणि हीच तुम्हाला नकोशी असलेली पिंपळ, कडुनिंब, वड, आणि तुळशीची झाडं इतर झाडांपेक्षा जास्तच ऑक्सिजन देतात. प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५० लिटर ऑक्सिजनची गरज असते, तुम्ही श्वासाच्या माध्यमातून जी हवा फुफ्फुसामध्ये घेता त्यात २०% ऑक्सिजन असतो म्हणजे एका व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी कमीत कमी तीन मोठ्या झाडांची आवश्यकता असते. जेवढे जास्त पानं तेवढा जास्त ऑक्सिजन. पण तुम्हाला आता छोट्या-छोट्या रंगबेरंगी देखण्या कुंडीतील रोपांची नितांत गरज वाटते, बाल्कनी टेरेसवर रेडिमेड प्लास्टिक लॉन्स आणि त्याबाजुला सजावट केलेल्या कुंड्या आकर्षक वाटतातच पण जागा असुनही आपण मोठी झाडं लावत नसु तर ऑक्सिजन आणणार कुठून ? ही छोटीशी रोपं किती ऑक्सिजन निर्माण करतील?

आता तुम्हाला वाटेल, सगळीकडे एवढी हवा तर असते मग आम्हाला ऑक्सिजन का नाही मिळणार? झाडं असु वा नसो हवा तर आम्हाला मिळतेच ना? फक्त हवा म्हणजेच ऑक्सिजन नाही, असं असतं तर मग डॉक्टर रुग्णाला तो मेडिकल ऑक्सिजन का देतात? मित्रांनो, तुम्ही जो हवेतून ऑक्सिजन घेता त्यात फक्त २१% इतकाच ऑक्सिजन असतो आणि ७८% नायट्रोजन आणि १% अन्य वायु म्हणजे तुम्हीच केलेलं प्रदुषण. मेडिकल ऑक्सिजन बनवण्याची प्रक्रिया किचकट आणि खर्चिक आहे, आताच्या काळात देशाच्या दुसऱ्या टोकाकडुन आपल्याला कित्येक मेट्रिक टनऑक्सिजन आयात करावा लागला, कितीतरी रुग्णाचे प्राण ऑक्सिजन वाचुन गेले व जात आहेत..!

डॉक्टर जे आता रुग्णांना ऑक्सिजन देत आहेत, त्यालाही तुम्हीच कारणीभूत आहात, मोठी मोठी श्वास देणाऱ्या झाडांची तुम्ही कत्तल केली, त्यामुळे ऑक्सिजनची पातळी इतकी घसरली की, आता रुग्णांना विकतचा मेडिकल ऑक्सिजन लावावा लागतो, आताच्या काळात तुम्हाला झाडांची व ऑक्सिजनची किंमत कळली असेल, लाखो करोडो रुपये खर्च करून तुम्ही मेडिकल ऑक्सिजन आयात करताय ते पण सरकारी बंदोबस्तात. तुम्ही झाडांची व निसर्गाची कधी एवढी काळजीच घेतली नाही तेवढी आता ऑक्सिजन बेडसाठी धावाधाव करताय हे बघुन खरचं खुप वाईट वाटतं पण आम्ही तरी आता काय करणार?

दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणाचे फक्त फलक-बॅनर लागतात, एक रोप, एकच खड्डा आणि त्यासाठी शंभर फोटो घेतले जातात, मग ते झाड जगलं का मेलं ? तुम्हाला त्याचं काहीच सोयरसुतक नसतं, पेपरच्या एका बातमीसाठी एवढी मेहनत? पण पेपरचं पानंही आमच्यापासुनच बनतं ना. सरकारी यंत्रणाही वृक्ष लागवड व वृक्ष गणनेची नोंद ठेवतात पण खरचं त्या झाडांची सद्यस्थितीत काय अवस्था आहे याची माहिती त्यांना तरी असते का?

सिमेंटच्या जंगलात आता तुमची मनही तशीच दगडासारखी टणक झालीत, फळाफुलांची झाडं आम्हाला आता शेजारच्याच्या दारात हवीत आणि फळफुलं मात्र आमच्याच अंगणात पडावी अशी तुमची भावना कधी बदलेल? तुमच्या बापजाद्यांनी, आज्जी-आजोबांनी आम्हाला पोटच्या पोरासारखं जपलं, वाढवलं, आम्ही त्यांना जीव लावला जेवढं देता येईल तेवढं दिलं, फळं, फुलं, आरोग्य आणि भरभरून मोकळा स्वच्छ ऑक्सिजनही दिला, त्यांच्यावर विकत प्राणवायु घ्यायची वेळच येऊ दिली नाही. ते तर अशिक्षित होते तुम्ही तर विद्वान आहात. शाळेत पर्यावरणाचे धडे घेतलेत, डिगऱ्या घेतल्यात तरीही टनावर ऑक्सिजन विकत घेताय ?

माझं खरचं थोडं ऐकाल का ? आपल्या अंगणात तुळस आणि शोभेची रोपं बिनदास्त लावा पण आपल्या परिसरात, मोकळ्या जागेत, कामाच्या ठिकाणी, रस्त्याच्याकडेला, शाळेच्या आवारात, शेतात, डोंगरात शक्य होईल त्या मोकळ्या ठिकाणी प्रत्येकाने एकच वडाच, कडुलिंबाचं, आंब्याचं, पिंपळाचं झाड लावा, ज्यांना जास्त आयुष्य आहे अशी मोठी-मोठी झाडं वर्षानुवर्ष तशीच भक्कम राहतील अशा वृक्षांची जास्त लागवड करून किमान दोन वर्ष त्याला जपा, त्याला मोठ्ठं होताना बघा त्यावर प्रामाणिक प्रेम करून लक्ष ठेवा, पाणी, खत, मशागत, आणि थोडासा त्यांनाही जीव लावा मग बघा तुम्हाला ऑक्सिजनची कधी कमी पडते का.. !

आता लवकरच पावसाळ्याचा जुन महिना येतोय, प्रामाणिकपणे “एक झाडं लावा” आपलं कर्तव्य समजुन, आपल्या व आपल्या पुढच्या पिढीसाठी. आता यासाठीही प्रामाणिक सामाजिक संघटना, निस्वार्थी उद्योजक, शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, संवेदनशील पुढारी, नगरसेवक, आमदार, खासदार यांनी पुढं आलं पाहिजे…! कुणाच्या भरवशावर बसण्यापेक्षा आपल्या भविष्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी..!

संत तुकाराम महाराज आपल्याला सांगुन गेलेत “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरं” यासाठीही थोडं हिरवंगार आयुष्य जगु..!!

तुमचाच मित्र
वृक्षवल्ली एक झाड
————————————

✍🏼 किशोर काशिनाथ हातागळे

WhatsAppShare