आणीबाणीविरोधात लढणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा सलाम

88

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – देशात ४३ वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी  २५ आणि २६ जूनच्या मध्यरात्री तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या स्वाक्षरीने  पहिल्यांदा आणीबाणी लागू केली. याबाबत पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे एकामागोमाग तीन ट्विट करुन आणीबाणीविरोधात लढणाऱ्यांना सलाम ठोकला आहे. तसेच कोणतीही शक्ती आपल्या संविधानाच्या मुलभूत सिद्धांतावर घाला घालू शकत नाही, अशी ग्वाही मोदींनी दिली.

दरम्यान, पंतप्रधान मोदी आज (मंगळवार) मुंबईत आणीबाणीविरोधात लढा देऊन लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात मोदी यांचे प्रमुख भाषण होणार आहे.

४३ वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीचा ज्या महिला-पुरूषांनी विरोध केला त्यांच्या साहसाला मी सलाम ठोकतो, असे मोदींनी ट्विट केले आहे. तर लोकशाही मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी आपण एकत्र मिळून काम करु. लिहीणे, चर्चा करणे, विचार व्यक्त करणे, प्रश्न विचारणे, हे आपल्या लोकशाहीचे महत्त्वपूर्ण पैलू आहेत. कोणतीही शक्ती आपल्या संविधानाच्या मुलभूत सिद्धांतांना धक्का लावू शकत नाही, असे मोदींनी म्हटले आहे.