आणीबाणीचे विरोधक आणि सर्मथक सत्तेसाठी एकत्र – पंतप्रधान मोदी

43

लखनौ, दि. २८ (पीसीबी) – देशातील आणीबाणीला ४३ वर्ष झाली असून आणीबाणीचे विरोधक आणि समर्थक आता गळ्यात गळे घालून एकत्र आले आहेत. केवळ सत्तेच्या लालसेपोटीच विरोधक एकत्र येत आहेत,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या संभाव्य महाआघाडीवर केली.  

उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगर येथे संत कबीरांच्या ५०० व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या मजारवर  मोदी यांनी चादर चढवली. त्यानंतर मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांवर तोफ डागली. विरोधकांना समाजाशी काही घेणं-देणं नसून केवळ आपल्या कुटुंबीयांचे कल्याण  साधण्यासाठी आणि सत्तेसाठी आणीबाणीचे समर्थक आणि विरोधक एक होत आहेत, अशी  टीका मोदी यांनी यावेळी केली.

काहींना शांतता आणि विकासाऐवजी देशात अराजकता हवी आहे. कारण त्यांना राजकीय फायदा उचलायचा आहे. संत कबीर, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या या देशाच्या स्वभावाचा यांना अंदाज नाही,’ असा टोला मोदी यांनी विरोधकांवर लगावला. देशातील वाईट प्रथा नष्ट व्हाव्यात, असे विरोधकांना वाटत नाही, त्यामुळेच त्यांनी तीन तलाकला विरोध केला आहे, असे मोदी म्हणाले.