‘…आणि त्याने वाईन शॉप मालकाच्या डोक्यातच फोडली दारूची बाटली’

88

पिंपरी, दि.२० (पीसीबी) : वाईन शॉप मध्ये खरेदीसाठी रांगेत उभे राहण्यास सांगितल्याने चौघांनी मिळून वाईन शॉपमच्या मालकाला दमदाटी करत डोक्यात दारूची बाटली फोडली. यामध्ये मालक गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर वाईन शॉपच्या गल्ल्यातील रक्कम चोरण्याचा देखील चौघांनी प्रयत्न केला. ही घटना 15 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वासात वाजता रिगल वाईन शॉप, पिंपरी येथे घडली.

कीर्ती लक्ष्मण राजपूत (वय 28, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 19) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पिंपरी येथे रिगल वाईन शॉप नावाचे दुकान आहे. त्या दुकानात जखमी मानसिंग हे मॅनेजर म्हणून काम करतात. विजया दशमी दस-याच्या दिवशी रात्री सव्वासात वाजता चारजण वाईन शॉपमध्ये आले. मॅनेजर मानसिंग यांनी त्यांना रांगेत येण्यास सांगितले.

त्यावरून चौघांनी मानसिंग यांच्यासोबत वाद घालून ओल्डमंक आणि व्हिस्की ही दारू मागितली. काही रोख रक्कम आणि काही ऑनलाईन ट्रान्सफर करून आरोपींनी त्याचे पैसे दिले. त्यानंतर आरोपींनी मोठी दारूची बाटली पाहिजे असल्याचे सांगून वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, फिर्यादी यांच्या डोक्यात दारूची बाटली फोडून त्यांना जखमी केले. तसेच लोखंडी पाईप आणि सिमेंटचे गट्टू दुकानावर मारले. दुकानासमोर राडा घालून आरोपी दुचाकीवरून निघून गेले. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.