‘….आणि त्याने चक्क चालत्या विमानातून उडी टाकली!’ असं नक्की काय घडलं…?

255

अमेरिका, दि.२७ (पीसीबी) : अमेरिकेच्या लॉस एंजेलिस विमानतळावर एक अजबच घटना घडली आहे. एका प्रवाशाने चालत्या विमानातून चक्क उडी टाकली आहे. या प्रकारानंतर या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. युनायटेड एक्सप्रेस हे विमान साल्ट लेक सिटीसाठी संध्याकाळी सात वाजता प्रयाण करत होतं. त्यावेळी ही घटना घडली.

या प्रवाशाने सुरुवातीला कॉकपीटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर तो सर्व्हिस डोअर उघडण्यात यशस्वी झाला आणि त्याने तिथूनच उडी मारली. विमानतळ अधिकाऱ्यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं. उडी मारल्याने त्याला काही जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर हे विमान परत आलं आणि तीन तासांपर्यंत या विमानाने प्रयाण केलं नाही.

गेल्या दोन दिवसांत विमानाच्या प्रयाणातला हा दुसरा अडथळा आहे. गेल्या गुरुवारीसुद्धा विमानतळावर अशाच प्रकारचा अडथळा निर्माण झाला होता. एक व्यक्ती आपल्या मालवाहू गाडीसह रनवे ओलांडत होता. मात्र पोलिसांनी तात्काळ या गाडीचा चालक आणि गाडी या दोघांनाही ताब्यात घेतलं, त्यामुळे दुर्घटना टळली. पण, दोन रनवे बंद करण्यात आले आहेत. विमानामध्ये मास्क परिधान करणं बंधनकारक आहे. या नियमाचं उल्लंघन केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा प्रवाशांवर कठोर कारवाई केली जात आहे. त्यामुळे या नियमांचं पालन न करणारे प्रवासी रागात विमानातून पळून जात आहे, असं विमानतळ प्रशासनाचं म्हणणं आहे.