“…आणि क्षणार्धात ती इमारत पत्त्यांसारखी कोसळली”; ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू; अजूनही बचावकार्य सुरु

39

मुंबई, दि.१० (पीसीबी) : मुंबईमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईमधील मालाडमध्ये एक रहिवासी इमारत पत्त्यांसारखी कोसळली. या दुर्घटनेत तब्बल ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे ही मोठी दुर्घटना घडली आहे. चारमजली इमारत शेजारच्या घरांवर कोसळली असल्याची माहिती मिळाली असून यानंतर आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली असून मृतांच्या संख्या वाढण्याची भीती आहे. रात्री ११ वाजून १० मिनिटांनी ही दुर्घटना घडली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी असून बचावकार्य सुरु आहे.

काळ मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावल्याने साऱ्यांची तारांबळ उडाली. त्याचवेळी मालाडच्या मालवणीमध्ये रात्रीच्या सुमारास ही इमारत कोसळली. इमारत शेजारी असणाऱ्या घरांवर कोसळली असून अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ढिगाऱ्याखाली काहीजण दबले असल्याची भीती असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री अस्लम शेख घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी त्यांनी मुसळधार पावसामुळे इमारत कोसळल्याची माहिती दिली. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य करत जखमींना कांदिवलीमधील रुग्णालयात नेण्यात आलं होतं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, “१७ जखमींना आणण्यात आलं होतं. यामधील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. इतर आठ जणांवर उपचार सुरु होते”.

WhatsAppShare