आणखी एक तारा निखळला: ‘बिग बॉस’ फेम आणि टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन

300

मुंबई, दि.०२ (पीसीबी) : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. सिद्धार्थचे वय 40 होते. आज त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याचा मृत्यू झाला. हि बॉलिवूड जगतासाठी अत्यंत दु: खद बातमी असून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याचे निधन झाले.

सिद्धार्थ शुक्लाने टीव्ही सीरियल ‘बालिका वधू’ मधून लोकप्रियता मिळवली. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. तो ‘दिल से दिल तक’ या मालिकेतही दिसला. त्याने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ही बातमी कळल्यानंतर संपूर्ण चित्रपट सृष्टी हादरली. त्यांचे चाहते दुःख व्यक्त करत आहेत. अगदी लहान वयात जग सोडून गेलेल्या सुशांत सिंह राजपूतच्या दुःखातून लोक अजून सावरू शकले नाहीत, की आज सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूच्या बातमीने देश शोकात बुडाला आहे. बिग बॉस 13 मधून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. पंजाबी अभिनेत्री शहनाज गिलसोबत त्याची जोडी चांगलीच पसंत झाली. दोघेही अलीकडेच बिग बॉस OTT मध्ये दिसले होते. याशिवाय सिद्धार्थ शुक्ला फियर फॅक्टर-खतरों के खिलाडी सीझन 7 मध्ये दिसला होता. त्यांनी सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंटसाठीही काम केले होते.