आढळराव पाटलांनी महामार्ग रुंदीकरणावरून १५ वर्षे फसविले; चौथ्यांदा मते मागण्याचा नैतिक अधिकार उरतो का?

284

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे सलग १५ वर्षांपासून खासदार आहेत. या १५ वर्षांत आढळराव पाटील यांना पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न सोडवता आलेला नाही, हे वास्तव आहे. नाशिक जिल्ह्यात महामार्गाचे रूंदीकरण पूर्ण झाले. तेथील लोकप्रतिनिधींनी शेतकरी आणि नागरिकांना विश्वासात घेऊन महामार्गासाठी भूसंपादन करून घेतले. मात्र खासदार आढळराव पाटील यांना ते १५ वर्षांत जमले नाही. याचाच अर्थ आढळराव पाटील यांना लोकप्रतिनिधीत्व करता येत नाही हे सिद्ध होते. त्यामुळे आढळराव पाटील यांना चौथ्यांदा मतदारांसमोर जाऊन मते मागण्याचा नैतिक अधिकार उरतो का?, हा खरा प्रश्न आहे. आढळराव पाटील यांनी विकासाच्या कितीही भूलथापा मारल्या तरी मतदार आता विचारी झाला असून, यंदा शिरूरमध्ये शिवसेनेची डाळ शिजणे अवघड दिसत आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण आहे. हा महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे कोणी खासदार आहेत, त्यांनी हा प्रश्न सोडवणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे तब्बल १५ वर्षांपासून या भागाचे लोकप्रतिनिधीत्व करत आहेत. या भागातील मतदारांनी आढळराव पाटील यांना सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून दिले आहे. सलग तीन वेळा खासदार होत असताना आढळराव पाटील यांनी शिरूर मतदारसंघातील पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अत्यावश्यक बाब म्हणून पूर्ण करून घेणे अत्यंत गरजेचे होते.

पुणे-नाशिक महामार्गाच्याभोवती औद्योगिक पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागातील उद्योगाला आणखी चालना मिळून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गाचे सर्वात आधी रुंदीकरण करून घेणे ही खासदार आढळराव पाटील यांची नैतिक जबाबदारी होती. परंतु, आढळराव पाटील यांनी मतदारांनी दिलेली नैतिक जबाबदारी पार पाडली नसल्याचे दिसून येते. याउलट पुणे-नाशिक या महामार्गाचे नाशिक जिल्ह्यात रुंदीकरण पूर्ण झाले आहे. तेथे रुंदीकरण पूर्ण होत असेल, तर पुणे जिल्ह्यात आणि खासदार आढळराव पाटील नेतृत्व करत असलेल्या लोकसभा मतदारसंघात महामार्गाचे रुंदीकरण पूर्ण होऊन नागरिकांना एक चांगला आणि मोठा रस्ता का उपलब्ध होऊ शकत नाही?, असा प्रश्न मतदारांना पडणे साहजिकच आहे.

महामार्गाच्या रुंदीकरणासाठी सलग १५ वर्षे केवळ पाठपुरावाच सुरू असेल, तर स्वतः आढळराव पाटील यांनी देखील आपण लोकप्रतिनिधीत्व करण्यासाठी कमी पडतोय हे मोठ्या मनाने मान्य करणे गरजेचे आहे. एका रस्त्याच्या रुंदीकरणाचा मुद्दा १५ वर्षे झाली तरी अजूनही निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा म्हणून पुन्हा पुन्हा वापरण्यात येत आहे. महामार्ग रुंदीकरणाचे आढळराव पाटील अजूनही आश्वासनच देत असतील, तर आपल्या लोकशाहीत कुठे तरी चुकत आहे, हे सुज्ञ मतदारांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. आढळराव पाटील यांच्यात प्रश्न सोडवण्याची धमक नसल्यामुळे आज पुणे-नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. रुंदीकरणाअभावी आतापर्यंत या महामार्गावर शेकडो जीव गेले आहेत. त्याचे पाप खासदार म्हणून आढळराव पाटील यांनीच स्वीकारले पाहिजे, अशी मतदारसंघातील मतदारांची मागणी आहे. त्यामुळे चौथ्यांदा मतांचा जोगवा मागणाऱ्या आढळराव पाटील यांना यंदा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.