“आज कुठे काही गोंधळ झाला आणि पोलिसांनी हवेत जरी गोळीबार केला तर पोलिसांची चौकशी होते पण…”

76

सांगली, दि.१९ (पीसीबी) : जयंत पाटील यांनी सांगलीतील पोलिस मुख्यालयातील नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ‘गृहमंत्री झाल्यावर ब्लडप्रेशर आणि शुगरचा त्रास सुरु होतो, हे मला अगोदरच आर आर आबांनी सांगितलं होतं आणि झालंही तसंच गृहमंत्री झाल्यानंतर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाला’, असं सांगितलं. शिवाय यावेळी त्यांनी राजकीय टोले सुद्धा लगावले.

सांगली पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालय याठिकाणी नूतन पोलीस अधीक्षक इमारत उभारण्यात येत आहे. या इमारतीच्या भूमिपूजन सोहळा जलसंपदा तथा सांगली जिल्हयाचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार सुमनताई पाटील,आमदार सुधीर गाडगीळ,आमदार विक्रम सावंत,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले, “पोलिसांना अधिकार वाढवून देणे गरजेचे आहे.आज कुठे काही गोंधळ झाला आणि पोलिसांनी हवेत जरी गोळीबार केला तर पोलिसांची चौकशी होते, गोंधळ घालणारे लांबच रहातात, त्यामुळे हवेत गोळीबार करणाऱ्यांची आम्ही चौकशी करतो, त्यामुळे आपण पोलिसांना संरक्षण देऊ, तेवढे अधिक धाडसाने पोलीस रस्त्यावर उतरतील.”

अनेक वेळा राज्यकर्त्यांमध्ये समज -गैरसमज होतात. त्यावेळी राज्यकर्ते तातडीने पहिल्यांदा पोलिसाला बदला अशी भूमिका घेतात, पण बदल हा उपाय नसतो, खरंच जर त्याची चूक असेल त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी गृहमंत्री झाल्यावर माझे ब्लड प्रेशर वाढल्याचे सांगितले. खरंतर 2009 मध्ये आर आर आबा पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाने आपल्यावर गृहखात्याची जबाबदारी दिली होती. पण गृहखाते घेण्याआधी एका लग्नाकार्यात आर आर आणि मी दोघे गेलो होतो. त्यावेळी आपण आबांना विचारले, गृहखाते कसं असतं? त्यावेळी आबांना मला विचारले की ? तुम्हाला ब्लड प्रेशर किंवा शुगर आहे का? मी आबांना सांगितलं, मला अजिबात त्रास नाही. त्यावर आबा म्हणाले गृहखाते घ्या, तुम्हाला दोन्ही गोष्टी सुरू होतील.आणि गृहमंत्री झाल्यानंतर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाला,आपल्या खासगी सचिवालाही ब्लड प्रेशर सुरू झाले, इतके तणावपूर्ण काम असते, त्यामुळे तेव्हापासून माझं मत आहे, की आता ब्लड प्रेशर सुरू झाले आहे, शुगर मागे लावून घ्यायचा नाही,अ शी आपली भूमिका आहे.

पण मंत्र्यांवर एवढा ताण असेल तर पोलिस किती तणावाखाली जगत असतील, याचा विचार केला पाहिजे. त्याच बरोबर पोलिसांच्या सुदृढतेकडे लक्ष देण्याबरोबर त्यांना थोडा थोडा आराम देण्यासह, त्यांच्यावरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे मतही मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

WhatsAppShare