आघाडीतील ‘आणखी’ एक मोठा पक्ष आगामी निवडणुका स्वबळावर लढणार

96

नांदेड, दि.२३ (पीसीबी) : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या ‘प्रहार संघटने’ने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली असून नांदेडमध्ये पक्षाच्या झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या 5 जिल्हा परिषद, तसंच त्या अंतर्गत येणाऱ्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याची घोषणा केली होती.

नांदेडमध्ये आयोजित बैठकीला जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. यातून आपल्या पक्षाची तळागाळातील ताकद समजण्यास मदत होईल, असे प्रहारच्या नेत्यांनी सांगितलं. अमरावतीमधील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार असलेले बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 19 जुलै रोजी मतदान होणार असून 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या 5 जिल्हा परिषद, तसंच त्या अंतर्गत येणाऱ्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी घोषणा केली. तर पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूका तेथील कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यानंतर घेण्यात येतील, असंही मदान यांनी स्पष्ट केलं.

नामनिर्देशनपत्र 29 जून 2021 ते 5 जुलै 2021 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. 4 जुलै 2021 रोजी रविवार असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 6 जुलै 2021 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे 9 जुलै 2021 पर्यंत अपील दाखल करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 12 जुलै 2021; तर अपील असलेल्या ठिकाणी 14 जुलै 2021 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 19 जुलै 2021 रोजी सकाळी 07.30 ते सायंकाळी 05.30 या वेळेत मतदान होईल. 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल, असेही मदान यांनी सांगितले.

WhatsAppShare