आगामी निवडणुकीसाठी मोदी सरकारचा १०० दिवसांचा मास्टर प्लॅन

224

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधी केंद्र सरकार नवीन प्रकल्पांच्या उद्धाटनांचा धडाका लावणार आहे. ज्या प्रकल्पांची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे किंवा येत्या तीन महिन्यात हे प्रकल्प पूर्ण होतील अशा २५ प्रकल्पांची निवड पंतप्रधान कार्यालयाने केली आहे. या प्रकल्पांचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: करणार असून केंद्र सरकारचे चार वर्षांतील विकासकामे म्हणून याचा प्रचार करण्यात येणार आहे.

एक महिन्यांपूर्वी पंतप्रधान कार्यलयाने सर्व खात्यांकडे राज्यनिहाय सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती मागितली होती. यामध्ये २०१४ मध्ये भाजप नेतृत्वातील केंद्र सरकार आल्यानंतर सुरू झालेल्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे. जेणेकरून हे प्रकल्प चार वर्षात केंद्र सरकारने पूर्ण केले असल्याचा दावा करण्यात येईल. लोकसभेच्या निवडणुकीआधी याची यादी जाहीर करण्यात येणार असून सरकार आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये या कामांचा उल्लेख करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी किमान १० लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात एका प्रकल्पाचे उद्धाटन करतील. नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्ते आणि परिवहन विभागाने सर्वाधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी पुढील तीन महिन्यात देशातील विविध भागात रस्ते प्रकल्पांचे उद्धाटन करण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांना केंद्राने प्राधान्य दिले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण देशात ५० सभा करण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकल्प उद्धाटनदेखील त्याचाच एक भाग असणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता असून त्यानंतर केंद्र सरकारला कोणत्याही प्रकल्प कार्यक्रमाचे उद्धाटन करता येणार नाही.

दरम्यान, केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना असणाऱ्या ‘आयुष्यमान’ योजनेचे २५ सप्टेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. तीन राज्यांमध्ये वर्षाखेरपर्यंत विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे या तीन राज्यांपैकी एका राज्यात ‘आयुष्यमान’चे लोकार्पण होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.