आक्षेपार्ह नृत्य प्रकरण: माधवी जुवेकरसह सातजण बेस्टमधून बडतर्फ

1043

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – बेस्टच्या कार्यक्रमात ओंगळवाणे नृत्य करणाऱ्या माधवी जुवेकरसह तिच्यावर पैशांची उधळण करणाऱ्या बेस्टच्या सात कर्मचाऱ्यांना बेस्टमधून बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच त्यांची पदोन्नती रोखण्‍याचाही निर्णय बेस्टतर्फे घेण्यात आला आहे.

मागील वर्षी दसऱ्यानिमित्त वडाळा आगारातील बेस्टच्या कार्यक्रमादरम्‍यान हा प्रकार घडला होता. येथे कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यामध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. यात बेस्टची कर्मचारी असलेली माधवी जुवेकरही सहभागी झाली होती.

या कार्यक्रमात माधवी जुवेकरसह एका कर्मचारी महिलेने आक्षेपार्ह नृत्य केले. एवढेच नव्हे तर यादरम्यान येथे उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर  नोटा उधळल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओही नंतर व्हायरल झाला होता. यामध्ये माधवी जुवेकरने तोंडात नोटा धरलेल्या स्पष्टपणे दिसत होत्या.