आकुर्डीत कोयत्याचा धाक दाखवून पळवल्या दारुच्या बाटल्या

130

आकुर्डी, दि. ११ (पीसीबी) – दुकानात आरडाओरडा करू नका असे म्हणाल्याने दारूच्या दुकानदाराला तिघांनी मिळून मारहाण केली. तसेच दुकानातील टीव्ही आणि कॅमेरे फोडून मोबाईल फोन आणि दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. ही घटना बुधवारी (दि. १०) दुपारी दोनच्या सुमारास आकुर्डी भाजी मंडईजवळ असलेल्या देशी दारूच्या दुकानात घडली.

याप्रकरणी प्रदीप लक्ष्मणराव खिरडे (वय २७, रा. निगडी, प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप यांचे आकुर्डी भाजी मंडईजवळ सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. बुधवारी दुपारी प्रदीप त्यांच्या दुकानात असताना तीनजण दारू पिण्यासाठी आले. दारू पिताना ते गोंधळ घालत होते. त्यामुळे प्रदीप यांनी त्यांना आरडाओरडा करू नका असे सांगितले. यामुळे तिघा आरोपींना राग आला आणि त्यांनी दुकानातील टीव्ही आणि कॅमेरे फोडले. प्रदीप यांच्या डोक्यात दारूच्या बाटल्या फोडून कोयत्याने वार केले. तसेच कोयत्याचा धाक दाखवून दुकानातून हजारो रुपयांच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. निगडी पोलिस तपास करत आहेत.