आई किंवा बहिणीचे ना-हरकत पत्र आणा अन् खुशाल डीजे लावा; लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची गणेश मंडळांना अट

1244

लातूर, दि. ३० (पीसीबी) – डिजेमुळे ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे लातूरच्या जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना एका वेगळ्या प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित गणेश मंडळांच्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना डिजे लावण्याची परवानगी देतो, असे सांगताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. परंतु, नंतर त्यांनी जे काही सांगितले, ते ऐकून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना काय करावे हेच सुचेनासे झाले. डिजे लावण्यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या पत्राची गरज नाही. केवळ तुमच्या आईचे किंवा बहिणीचे ना-हरकत पत्र सोबत आणा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना सांगितले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. कधी मिश्कील शैलीत तर कधी गंभीरपणे बोलत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गणेशोत्सवातील बदलत्या वातावरणावर भाष्य केले. आई-बहिण आपली जास्त काळजी घेतात. घरात टीव्हीचा थोडा आवाज जरी वाढवला तरी ते आतून आपल्याला आवाज कमी करायला सांगतात. त्यामुळे त्यांचे ना-हरकत पत्र डीजेसाठी तुम्हाला मिळणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. जर ती मिळालीच तर थेट माझ्याकडे या. या विषयासाठी मी ‘एक खिडकी योजना’ सुरू केली आहे. तिथे मीच बसतो. परवानगी दिल्यानंतर आपण आधी तुमच्या घरी डीजे लावू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवात तुम्ही डीजे लावता. त्यावर देवाची गाणी किती असतात सांगा? मुन्नी-शिला हीच गाणी सतत लोकांना ऐकायला मिळतात. त्यावर विचित्र पद्धतीने डान्स केला जातो. अशा प्रकारच्या गाण्यांवर डान्स करायचा इतका शौकच असेल, तर आम्हाला प्रत्येक तालुक्याला एक डीजे सेंटर सुरू करावे लागेल. ‘‘नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ऐ दिल है मुश्‍किल’ या चित्रपटांत सायलेंट डीजे दाखवला आहे. गर्दीतल्या प्रत्येकाने आपापल्या कानाला हेडफोन लावायचा आणि हवे ते गाणे ऐकायचे. त्यामुळे दुसऱ्याला त्रास होत नाही. मग ही पद्धत तर स्वीकारा. मात्र, डीजे लावून दुसऱ्याला त्रास देणे टाळा. यामुळे प्रदूषणही होणार नाही, असेही त्यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना सांगितले.