आईच्या दुसऱ्या लग्नानंतर मुलाचे भावनिक पत्र; नेटकरी भावूक

353

कोल्लम, दि. १२ (पीसीबी)- ‘आई, सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा’ केरळमधील कोल्लम येथील गोकुळ श्रीधर याने आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नानंतर लिहिलेली फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही पोस्ट वाचून अनेकजण भावूक झाले आहेत. मल्याळम भाषेत असणाऱ्या या ह्रदयस्पर्शी पोस्टमध्ये गोकुळ याने आपल्या आईला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गोकुळ याच्या फेसबूक पोस्टमधून त्यांच्या आईने आयुष्यात खूप हालअपेष्टा सहन केल्याचे कळत आहे.

गोकुळ याच्या आईला पहिल्या पतीकडून घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागले होते. फक्त आपल्यासाठी आई हे सर्व सहन करत असल्याची खंत नेहमी गोकुळ याला वाटत होती. आपल्या मनावर एक ओझे घेऊन तो नेहमी जगत होता. पण आता जेव्हा त्याच्या आईने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे तेव्हा गोकुळ यांनी आपण आनंदी असून, यापेक्षा दुसरी सुखावणारी कोणतीच गोष्ट नाही असे म्हटले आहे.

‘ज्या महिलेने माझ्यासाठी तिचे सारे सुख बाजूला ठेवले. तिने पहिल्या पतीकडून अनेक यातना सहन केल्या आहेत. जेव्हा तिला मारहाण व्हायची, डोक्यातून रक्त वाहायचे तेव्हा अनेकदा तू हे का सहन करत आहेस हे मी तिला विचारायचो. यावेळी अनेकदा मी हे सगळे तुझ्या भल्यासाठी सहन करत असल्याचे ती सांगायची हे मला स्पष्ट आठवते. तो दिवस जेव्ही मी तिच्यासोबत घर सोडलं तेव्हा मी या सर्व क्षणांचा विचार केला. जिने माझ्यासाठी सर्व तरुणपण घालवलं, त्या माझ्या आईची अनेक स्वप्नं आहेत. अजून खूप मोठी उंची तिला गाठायची आहे. मला अजून काही बोलायचं नाही. ही अशी एक गोष्ट आहे जी लपवता कामा नये असे मला सारखे वाटत होतं. आई, सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा’, असे गोकुळ याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

फेसबुकवर अशा पद्धतीने आपल्याच आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल भावना शेअर करताना गोकुळ याला थोडी भीतीदेखील वाटत होती. समाजातील काही ठराविक लोक हे सकारात्मकपणे घेतील की नाही याबाबत त्यांना शंका होती. पण नंतर त्यांना याच लपवण्यासारखं काही नसून, उलट ज्यांची विचासररणी छोटी आहे त्यांनी हे वाचलंच पाहिजे असा विचार करत पोस्ट लिहिली असे त्याने सांगितले आहे

‘हे माझ्या आईचे लग्न होते. याबद्दल लिहावे की नाही याबद्दल मी खूप विचार केला. कारण आजही अनेक लोकांना दुसरे लग्न केलेले पटत नाही. अनेकजण संशयी, दया आणि द्वेष या नजरेतून पाहतात. पण जरी तुम्ही पाहिलेत तरी फरक पडणार नाही’, असे गोकुळ याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

गोकुळ याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आईचा दुसऱ्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे. फेसबुकवर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून अनेकजण भावूक झाले आहेत. अनेकांनी नवदांपत्याचे कौतुक केले आहे.