आंबेनळी घाटात कोसळलेल्या बसमधील ३० मृतदेह बाहेर काढण्यात यश

709

रायगड, दि. २९ (पीसीबी) – रायगडच्या पोलादपूर नजीकच्या आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातील ३० जणांचा मृत्यू झाला असून या सर्वांचे मृतदेह एनडीआरएफ, आरसीएफ आणि ट्रेकर्सच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षासहलीला निघालेली खासगी बस ८०० फूट दरीत कोसळून ३१ पैकी ३० जणांचा मृत्यू झाला, तर सुदैवाने एक जण बचावला. अपघातग्रस्त सर्वजण दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. जवान आणि ट्रेकर्सनी शनिवारी रात्रीपर्यंत २१ मृतदेह बाहेर काढले होते. अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले, मात्र आज (रविवारी) सकाळी पुन्हा ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये दापोली कोकण कृषी विद्यापीठातील तिन अधीक्षक, चार सहाय्यक अधीक्षक, नऊ वरिष्ठ लिपीक, ११ कनिष्ठ लिपीक, एक लॅबबॉय, दोन चालकांचा समावेश आहे. मात्र या थरारक अपघातात अधीक्षक प्रकाश सावंत-देसाई हे एकटेच बचावले आहेत.