आंबेडकरवादी- डाव्या चळवळीतील कार्यकर्ते, जेएनयूचे नेते, बीबीसी पत्रकारांवरही सतत पाळत

35

नवी दिल्ली, दि.२१ (पीसीबी) : एक जातविरोधी नेता तसेच अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचे दूरध्वनी क्रमांक पेगॅसस प्रोजेक्टला मिळालेल्या एका डेटाबेसमध्ये असल्याचे आढळून आले आहे. इस्राइलमधील एनएसओ ग्रुपच्या स्पायवेअरद्वारे लक्ष्यित केल्या गेलेल्या व्यक्तींचीही नावे त्यामध्ये आहेत. या डेटाबेसमधील नोंदींमध्ये आढळलेल्या दूरध्वनी क्रमांकांमध्ये आंबेडकरवादी कार्यकर्ते अशोक भारती, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य आणि बनज्योत्स्ना लाहिरी, नक्षलवाद्यांचे वर्चस्व असलेल्या प्रदेशांमधील जीवनाबद्दल सातत्याने लिहिणाऱ्या बेला भाटिया, रेल्वे युनियन नेते शिव गोपाल मिश्रा, कामगार हक्कांसाठी लढणारे दिल्लीस्थित कार्यकर्ते अंजनी कुमार, कोळसा खाणींच्या विरोधातील लढ्यामधील कार्यकर्ते आलोक शुक्ला, दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक सरोज गिरी, बस्तरमधील शांतता चळवळीचे कार्यकर्ते शुभ्रांशु चौधरी, माजी बीबीसी पत्रकार आणि ट्रेड युनियन कार्यकर्ते संदीप कुमार राय “राउजी”, राउजी यांचे सहकारी खालिद खान, आणि बिहारमधील कार्यकर्ता इप्सा शताक्षी यांचा समावेश आहे.

डिजिटल फोरेन्सिक तपासणीशिवाय त्यांचे फोन हॅक किंवा संसर्गित झाले होते का ते निर्णायकरित्या स्थापित करणे शक्य नाही. पण यादीतील त्यांची नावे पाहता एनएसओ ग्रुपच्या अज्ञात ग्राहकाला या व्यक्तींमध्ये स्वारस्य असावे असे दिसते. एनएसओ सांगते, ते त्यांचे पेगॅसस स्पायवेअर, जे लष्करामध्ये वापरल्या जाणाऱ्या पाळत तंत्रज्ञानाच्या श्रेणीचे आहे, केवळ पडताळणी केलेल्या सरकारी संस्थांनाच विकतात. मोदी सरकारने आपण एनएसओचे ग्राहक आहे की नाही हे घोषित करण्याला वारंवार नकार दिला आहे.

जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर पाळत
अनिर्बान भट्टाचार्य आणि उमर खालिद हे दोघेही जेएनयूमध्ये पीएचडी करत असताना त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आनिर्बानने द वायरला सांगितले, की तेव्हापासून ते दोघेही, आणि बनोज्योत्स्ना लाहिरी हे अनेक संघटनांच्या उपक्रमांमध्ये सामील असतात. विशेषतः देशात वाढत्या द्वेषभावनेतून जे गुन्हे केले जातात त्यांच्याविरुद्ध त्यांचा लढा चालू आहे. मुस्लिमांच्या झुंडहत्यांच्या विरोधातील नॉट इन माय नेम तसेच युनायटेड अगेन्स्ट हेट (यूएएच) या नावाने चालू असलेल्या मोहिमांमध्येही ते सामील होते. खालीदला सध्या दिल्ली दंगल प्रकरणी यूएपीए कायद्याखाली अटक झालेली असून तो तुरुंगात आहे. पाळत ठेवण्यासाठी संभाव्य लक्ष्यांच्या यादीत नाव असल्याचे सांगितले असता बनोज्योत्स्ना आणि अनिर्बान या दोघांनीही द वायरला सांगितले की विरोध चिरडून टाकण्याचा हा आणखी एक मार्ग सरकार अवलंबते आहे.

२०१७ ते २०१९ या काळात आपण नवी दिल्लीतील सेंटर फॉर इक्विटी स्टडीज या संस्थेत संशोधक म्हणून काम करत होतो असे अनिर्बानने सांगितले. कामगार आणि वंचित घटकांच्या परिस्थितीबाबत तो त्यावेळी काम करत होता असे त्याने सांगितले. “मला आश्चर्य वाटत नाही… खूप किरकोळ कारणांसाठी आजकाल लोक तुरुंगात जात आहेत. हीच आता ‘नवी सामान्य स्थिती’ आहे, लोकशाहीच्या मूळ गाभ्याचेच उल्लंघन करणारी,” द वायरशी बोलताना तो म्हणाला.

WhatsAppShare