आंदोलनाला दिशा देण्यासाठी मराठा आरक्षण परिषद घेणार – खासदार उद्यनराजे

223

पुणे, दि. ३ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला दिशा देण्यासाठी मराठा आरक्षण परिषद आयोजित करणार आहे. या परिषदेत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना न्याय मिळवून देण्यासाठी मी बांधील असेल, अशी ग्वाही साताऱ्याचे खासदार छत्रपती उद्यनराजे भोसले यांनी आज (शुक्रवार) येथे दिली.   

मराठा आरक्षणाबाबत उद्यनराजे यांनी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष एम जी गायकवाड यांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलताना म्हणाले की, मी काही नेता नसून मला कोणतीही प्रसिद्धी नको. मराठा समाजाच्या परिषदांना न्याय मिळण्यासाठी मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करणार आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला दिशा देण्यासाठी ही परिषद असेल. मात्र, ही दिशा हिंसक नसावी. कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही माफक अपेक्षा ठेवून दीड वर्षांपूर्वी ५८ मूकमोर्चे काढण्यात आले. याची सरकारने गंभीर दखल घेतली असती, तर लोकांना जीव द्यावे लागले नसते. सरकारने केवळ आश्वासन दिले. मात्र, त्याकडे सोयीस्करपणे  दुर्लक्ष केले. प्रश्न जर वेळीच हाताळला असता, तर ही वेळ आली नसती. आता अशी वेळच आली आहे की आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे उद्यनराजे म्हणाले.