अॅड. गडलिंग, शोमा सेन यांच्या जामीन अर्जावर २७ सप्टेंबरला सुनावणी होणार

109

पुणे, दि. १४ (पीसीबी) – नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन अॅड. सुरेंद्र गडलिंग आणि प्रा. शोमा सेन यांना अटक करण्यात आले होते. या दोघांनी पुणे न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला पुण्यातील शनिवार वाड्याच्या प्रांगणात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी १ जानेवारी रोजी नगर रस्त्यावरील भीमा–कोरेगाव येथे हिंसाचार उसळला होता. एल्गार परिषदेचे आयोजन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांकडून एल्गार परिषदेच्या आयोजनासाठी आर्थिक मदत मिळाल्याचा दावा करत पुणे पोलिसांनी जून महिन्यात अॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन यांना अटक केली होती. त्यांच्याकडील जप्त करण्यात आलेले लॅपटॉप, कागदपत्रे तसेच ईमेलवरुन पाचही जण नक्षलवादी संघटनांच्या संपर्कात होते हे उघड झाले, असा दावा पोलिसांनी केला आहे.

सध्या पाचही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून सध्या ते पुण्यातील येरवडा कारागृहात आहेत. यातील गडलिंग आणि शोमा सेन यांनी शुक्रवारी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. ७ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सरकारी पक्षाला त्यांची बाजू मांडण्यासाठी मुदत दिली होती.  या जामिन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली.  या जामिन अर्जावर पुणे न्यायालय पुढील सुनावणीला म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी निर्णय देणार आहे. याच दिवशी पाचही आरोपींना दुसऱ्या कारागृहात हलवण्याबाबतही न्यायालय निर्णय देणार आहे.