अॅट्रॉसिटी खटल्यात उच्च न्यायालयाकडून नारायण राणेंना तूर्तास दिलासा

148

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी दाखल केलेली याचिका स्वीकारत अॅट्रॉसिटी खटल्यातून मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना तूर्तास दिलासा दिला आहे. उच्च् न्यायालय यासंदर्भात अंतिम निकाल देत नाही, तोपर्यंत सत्र न्यायालयातील संबंधित खटल्याला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली.

न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे यावर आज (मंगळवारी) सुनावणी झाली. नारायण राणे, बाळा नांदगावकर आणि नारायण राणेंचे निकटवर्तीय रवी शेंडगे यांना अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यातून दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिल्यानंतर यांनी उच्च न्यायालयात  दाद मागितली होती.

२००२मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार पद्माकर वळवी यांचे अपहरण केल्याबद्दल या तिघांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी तिघांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावेळी नारायण राणे आणि बाळा नांदगावकर हे दोघेही शिवसेनेत होते.