असंघटित कामगार कॉंग्रेस आपल्या दारी उपक्रमाचे शुक्रवारी उद्‌घाटन…..सुंदर कांबळे

3

– लॉक डाऊन व अनलॉक काळातील समस्या जाणून घेऊन अहवाल सादर करणार

पिंपरी, दि. 19 (पीसीबी) – कोरोना या जागतिक महामारीत उद्‌भवलेल्या समस्यांमुळे असंघटीत कामगारांवर रोजगार गमाविण्याचे व उपासमारीचे संकट कोसळले. अचानक आलेल्या आर्थिक संकटामुळे हजारो कुटूंबांला आपल्या मुळ गावी स्थलांतरीत व्हावे लागले. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून अनेक असंघटीत कामगार पुन्हा शहरांकडे येऊ लागले आहेत. या काळात त्यांना आलेल्या समस्या जाणून घेण्यासाठी व या समस्यांबाबत सक्षम मदत केंद्र व राज्य सरकारकडून मिळवून देण्यासाठी असंघटीत कामगार कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहरात अभियान राबविणार आहे, अशी माहिती असंघटीत कामगार कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी दिली.

रविवारी (दि.18) असंघटीत कामगार कॉंग्रेस शहर पदाधिका-यांची मासिक आढावा बैठक सुंदर कांबळे यांच्या अध्यक्षाखाली घेण्यात आली. यावेळी ‘असंघटित कामगार कॉंग्रेस आपल्या दारी उपक्रम’ हा उपक्रम शुक्रवार (दि.23) ते शुक्रवार (दि.30) राबविण्याचे जाहिर करण्यात आले.

या अभियानासाठी असंघटीत कामगार कॉंग्रेसचे अध्यक्ष सुंदर कांबळे, महिला शहराध्यक्षा शितल कोतवाल, माथाडी कामगारचे अध्यक्ष नितीन पटेकर, हातगाडी पथारीचे अध्यक्ष अझरुध्दीन पुणेकर, शहर सचिव मनोहर वाघमारे, ड्रायवर संघटनेचे अध्यक्ष नवनाथ डेंगळे, लघुउद्योग समन्वयक विजू शिंदे, सोशल मिडीया समन्वयक मोहन उणवणे यांचे शिष्टमंडळ मोशी पासून रावेत पर्यंत आणि दापोडी पासून निगडी पर्यंत असंघटीत कामगारांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

या अभियानाचे उद्‌घाटन शुक्रवारी (दि.23) सकाळी 11 वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या अभियानात घरेलू कामगार, टपरी, पथारी, हातगाडी, माथाडी, अॅटो रिक्षाचालक, ड्रायवर, सुरक्षा रक्षक, गवंडी, बिगारी, पेंटर, ठेकेदारीवर काम करणारे महापालिकेतील व इतर कामगार, सफाई कामगार यांना प्रत्यक्ष भेटून लॉक डाऊन व अनलॉक काळातील समस्या जाणून घेण्यात येणार आहेत.

WhatsAppShare