अशी असणार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची कार्यरचना

307

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – बहुप्रतिक्षीत पिंपरी-चिंचवड शहराच्या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे येत्या १५ ऑगस्टला कामकाज सुरु होण्याची शक्यता आहे. आयुक्तालयाचे काम सुरु करण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाकडून १५ ऑगस्ट दरम्यान नोटिफिकेशन काढणार असल्याचे समजते. शहराच्या पोलीस आयुकतालय हद्दीचा नकाशा देखील तयार करण्यात आला आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्तालयाची कार्यरचना नेमकी कशी असणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध कक्षांसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण ४ हजार ८४० पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कडून २ हजार २०७ पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. तर उर्वरित २ हजार ६३३ पदे नव्याने भरती करण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस आयुक्त (आर के पद्मनाभन), अतिरिक्त पोलीस आयुक्त (मकरंद रानडे),  पोलीस उप आयुक्त (नम्रता पाटील, विनायक ढाकणे, स्मार्तना पाटील) काम पाहणार आहेत. तसेच या आयुक्तालयामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त – ७, पोलीस निरीक्षक – ६७, सहाय्यक पोलीस निरीक्षक – ८६, पोलीस उप निरीक्षक – २१५, सहाय्यक पोलीस उप निरिक्षक – ३७३ असणार आहेत. यामध्ये शहरातील पिंपरी, चिंचवड, निगडी, सांगवी, वाकड, हिंजवडी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, दिघी असे नऊ तर ग्रामिण मधील चाकण, आळंदी, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, देहुरोड हे पाच तर नव्याने समावीष्ट होणारे चिखली पोलीस ठाणे असे एकूण १६  पोलीस  ठाण्यांचा समावेश असणार आहे.