अविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड

353

गांधीनगर, दि. १७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातील ठाकोर समुदयाचा एक विचित्र निर्णय समोर आला आहे. दांतीवाडामध्ये अविवाहित मुलींच्या मोबाइल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जर अविवाहित मुलीने मोबाइल वापरला तर वडिलांना दीड लाखांचा दंड भरावा लागणार आहे. एकीकडे जगभरात स्त्री-पुरूष समानतेच्या गोष्टी बोलल्या जात आहे. काही क्षेत्रात तर मुलींनी मुलांनाही मागे टाकले आहे. मात्र, गुजरातमधील ठाकोर समुदायाची विचित्र गोष्ट समोर आली आहे.

गुजरातमधील दांतीवाडामधील ठाकोर समुदायाने हा नवीन नियम केला आहे. ज्यामध्ये अविवाहित मुलीच्या मोबाइल वापरावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. तसेच आंतरजातीय विवाहावरही बंदी घालण्यात आली आहे. जर ठाकोर समुदयातील मुलीने इतर जातीच्या मुलासोबत लग्न केल्यास दीड लाखांचा दंड द्यावा लागणार आहे. ठाकोर जातीमधील मुलाने इतर जातीच्या मुलीसोबत लग्न केल्यास दोन लाखांचा दंडाचा नियम करण्यात आला आहे.

१४ जुलै रविवारी जगोल गावात झालेल्या ठाकोर समुदयाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला ठाकोर समुदयातील ८०० नेत्यांचा सहभाग होता. या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाला ठाकोर समाजातील लोक संविधानाप्रमाणे मानतात. त्यानुसार, अविवाहित मुलीने मोबाइल वापरण्याचा गुन्हा केल्यास दंड म्हणून वडिलांना दीड लाख रूपये द्यावे लागणार आहेत.