अविवाहित परदेशी जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याची परवानगी; सौदी अरेबियाचा निर्णय

193

सौदी अरेबिया, दि. ७ (पीसीबी) – सर्वाधिक बंधने असलेले राष्ट्र अशी जगभरात सौदी अरेबियाची ओळख आहे. मात्र, येथील काही कठोर नियमांमध्ये आता शिथिलता देण्यास सरकारकडून सुरूवात झाली आहे. अविवाहित परदेशी जोडप्यांना आता हॉटेलमध्ये एकाच रुममध्ये राहण्याची परवानगी येथील सरकारने दिली आहे.

यापूर्वी सौदी अरेबियातील नियमांनुसार परदेशातून आलेल्या जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्यासाठी ते विवाहित असल्याचा पुरावा द्यावा लागायचा. म्हणजेच विवाह दाखवणे बंधनकारक होते. मात्र आता यापुढे ही अट नसेल. पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी पूर्वीचे नियम शिथिल करण्यात आल्याचे मानले जात आहे. याशिवाय, सर्व एकट्या महिलांना (सौदीच्या महिलांनाही) हॉटेलमध्ये रुम बुक करण्याची परवानगी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे.

“हॉटेल चेकिंगच्यावेळी नात्याचे प्रमाण सिद्ध करणारी कागदपत्र सौदी अरेबियाच्या नागरिकांना दाखवणे बंधनकारक असेल. पण, देशाबाहेरच्या जोडप्यांसाठी हे बंधनकारक नसेल. सर्व महिला ओळखपत्र दाखवून हॉटेलमध्ये रुम बुक करू शकतील. तसेच सौदीच्या महिलादेखील हॉटेलमध्ये रुम बुक करू शकतील” असे सौदी सरकारच्या पर्यटन आणि नॅशनल हेरिटेज मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

WhatsAppShare