‘अल अराम्को’ने आयपीओ बासनात गुंडाळला; नाणारला फटका

213

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – सौदी अरेबियाची कंपनी ‘अल अराम्को’ने आयपीओ काढण्याचा निर्णय बासनात गुंडाळल्याचे वृत्त  विश्वसनीय सूत्रांनी दिले आहे. दरम्यान,  सौदी अरेबियाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. ज्यावेळी परिस्थिती अनुकूल असेल, ती वेळ निवडून त्यावेळी आयपीओ आणण्यावर सरकार ठाम आहे, असे सौदी अरेबियाच्या खलिद अल फलिह यांनी म्हटले  आहे.

सौदी अराम्को ही सौदी अरेबियाची संपूर्णपणे सरकारी मालकीची कंपनी आहे. सौदी अरेबियाने महाराष्ट्रामध्ये नाणार येथे होणाऱ्या महत्त्वाकांक्षी रिफायनरीमध्ये गुंतवणूक करण्याचा  केंद्र सरकारबरोबर करार केला  होता. मात्र, आता सौदी अरेबिया जर आयपीओच आणणार नसेल तर कदाचित ते नाणारमध्येही गुंतवणूक करणार नाहीत, अशी भीती आहे. परिणामी, एकीकडे स्थानिकांचा प्रचंड विरोध होत असताना जर अराम्कोसारख्या गुंतवणूकदारांकडून पाय काढता घेतला तर त्याचा फटका नाणारला बसेल, अशी शक्यता व्यक्त् केली जात  आहे.

दरम्यान, जगातील बडा तेल निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाने कच्चा तेलासाठी अन्य देशांमध्ये गुंतवणूक करुन बाजारपेठ मिळवण्याचे धोरण आखले होते. सौदी अरेबिया सरकारची मालकी असलेल्या सौदी अराम्कोकडून त्या दिशेने सुरुवातही झाली होती. भारताचा विचार केला तर, महाराष्ट्रातही या कंपनीने नाणार येथे तेलशुद्धीकरण प्रकल्पात गुंतवणूक करण्यास करार केला होता. मात्र, या नव्या घडामोडींमुळे नाणारवर त्याचा काय परिणाम होणार हे बघणे  महत्त्वाचे  ठरणार आहे.