…अलोट गर्दीत वाकड आणि हिंजवडीत बगाड उत्साहात!

17

वाकड आणि हिंडवडी ग्रामदैवत आणि पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हातोबा देवाचे पारंपारिक बगाड शनिवारी (दि. ३१) खोबरे आणि भंडाऱ्याच्या उधळणीत उत्साहात पार पडले. बगाड मिरवणुकीत हजारो ग्रामस्थ आणि भाविक सहभागी झाले. म्हातोबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

हिंजवडी गावठाणातील होळी पायथा मैदानापासून बगाड मिरवणुकीस सुरूवात झाली. वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिरात मिरवणुकीची सांगता झाली. बगाडासाठी गळकरी होण्याचा मान हिंजवडीतील जांभूळकर वाड्यातील तरूणाचा असतो. त्यानुसार बगाडाचा रथ रिंगण मैदानात आल्यानंतर जीवन जांभूळकर या तरुणाच्या नावाची गळकरी म्हणून घोषणा झाली. तसेच सतीश बाळासाहेब साखरे आणि नंदकुमार सुदाम साखरे यांना खांदेकरी होण्याचा मान मिळाला.

कडाडणाऱ्या हलगीच्या नादात “पैस…पैस…,म्हातोबाच्या नावानं चांगभलं” च्या जयघोषात गळकऱ्याला गावठाणातील म्हातोबा मंदिरात नेण्यात आले. तेथे मानाची कावड गेल्यानंतर गळकऱ्याच्या गळ्यात चाफ्याच्या फुलांची माळ टाकण्यात आली. तेथे म्हातोबाचे दर्शन घेऊन खांदेकऱ्यांच्या सहाय्याने मारूती मंदिरात नेण्यात आले. पाचच्या सुमारास हजारो भाविकांच्या तुफान गर्दीत खांदेकऱ्यांनी गळकऱ्याला होळी पायथा मैदानावर आणले. येते हिंजवडी गावच्या वतीने सुतार समाजातील मानकऱ्याने गळकऱ्याला गळ टोचला.

गळ टोचलेल्या जीवन यांना रिंगण मैदानात नेऊन बगाडावर बसवून हजारो भाविकांच्या साक्षीने पाच गोल फेऱ्या मारण्यात आल्या. हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी आयटी अभियंत्यांसह ग्रामस्थ आणि नागरिकांचेही हात उंचावले होते. गळकऱ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविक आटापिटा करत होते. अनेकजण त्यासाठी उंच ठिकाणी गेले. पुढे ही मिरवणूक हिंजवडी, भूमकर वस्ती, केमसे वस्ती, वाकडकर वस्ती, भुजबळ वस्ती येथून मार्गस्थ झाली. वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिरात मिरवणुकीची सांगता करून गळकऱ्याला मंदिरात नेण्यात आले.