पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या हल्लाबोल आंदोलनात केली होती. काँग्रेसनेही आमची ताकद बारामती लोकसभा मतदारसंघात वाढल्याने आमचा उमेदवार ही जागा लढवेल अशी पुडी काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष देवीदास भन्साळी यांनी सोडली. भन्साळींच्या या वक्तव्यानंतर गुरूवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी चांगलीच खिल्ली उडवली. अजित पवार म्हणाले, अरे बापरे! काँग्रेसचा उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघातून आता लढणार म्हणजे आमचे डिपॉजिटचं जप्त होणार की राव… अशी खोचक टिका केली.

पुणे शहरातील लोकसभेची जागा काँग्रेसकडे असून ती आतापर्यंत कधीही राष्ट्रवादीने लढविली नाही. २००९ मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी पुण्याचे खासदार होते. मात्र, २०१४ साली मोदी लाटेत भाजपने ही जागा खेचली. मात्र, आताच्या परिस्थितीत पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात काँग्रेसची संघटना पातळीवर अवस्था खूपच वाईट आहे. पुणे महापालिकेत भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीचे नगरसेवक व ताकद आहे. त्यामुळे पुण्याची जागा लढण्यास राष्ट्रवादी उत्सुक आहे.